सध्या सर्वत्र कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट आहे. हा विषाणू नेमका काय आहे व त्यापासून नक्की कसे संरक्षण करावे याबाबत सरकार नियमितपणे जनजागृती करत आहे. मात्र आता महाराजगंज आणि आझमगड जिल्ह्यानंतर, उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) धार्मिक शहर वाराणसी (Varanasi) व कुशीनगर (Kushinagar) शहरातून अशी छायाचित्रे समोर आली आहेत, जी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कोरोना विषाणूचा संसर्ग दुर्गम खेड्यांमध्येही पसरला आहे. ग्रामीण भागात या आजाराने अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. परंतु उत्तर प्रदेश’च्या काही शहरांमध्ये महिला या विषाणूला 'कोरोना माई' (Corona Mai) समजून तिची पूजा करत आहेत.
वाराणसीच्या जैन घाटावर कोरोना विषाणूला देवी मानून महिला सकाळ संध्याकाळ तिची पूजा करताना दिसत आहेत. त्यांचा विश्वास आहे की अशा पूजेने ही देवी लवकरच लोकांना या आजारातून मुक्त करेल. या महिलांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची 21 दिवस पूजा करण्याचा संकल्प सोडला आहे. ही पूजा करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही कोरोना माईची पूजा करत आहोत जेणेकरुन हा साथीचा रोग टाळता येईल. आम्हाला खात्री आहे की पूजेमुळे लवकरच प्रत्येकाला या आजारापासून मुक्ती मिळेल.
या प्राणघातक आजाराशी लढण्याचा असा सल्ला कोणी दिला असे विचारले असता, एक श्रद्धाळू महिला म्हणाली, ‘अनेक पंडितांनी सांगितले आहे की कोरोना व्हायरस रोखण्यासाठी आपण प्रार्थना करावी.’
यूपीच्या कुशीनगर जिल्ह्यातून दुसरा फोटो समोर आला आहे, जिथे कोरोनाला पिटाळून लावण्यासाठी गावकऱ्यांनी अंधश्रद्धेचा आधार घेतला आहे. एका अध्यात्मिक बाबाच्या सांगण्यावरून, हाटा कोतवालीच्या डुमरी मलाव खेड्यातील महिलांनी 'कोरोना माई' ची पूजा करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. मंदिराजवळ महिला घेराव घालून पूजा करत आहेत. ही पूजा कित्येक तास चालत आहे, मात्र स्थानिक प्रशासनाला याची अजिबात माहिती नव्हती. या पूजेवेळी कोविड प्रोटोकॉलचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले.