
खारघरमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (ISKCON) 6 ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत खारघरमधील गोल्फ कोर्स समोरील मंदिर परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) साजरी करणार आहे. येत्या 7 सप्टेंबर, 2023 रोजी होणार्या जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री होणारा श्री कृष्णाचा महाअभिषेक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असेल. इस्कॉन खारघर येथे जन्माष्टमी उत्सवाची तयारी सुमारे दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे.
भगवान श्रीकृष्णाच्या 5250 व्या जयंती निमित्त, 7 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता विधीपूर्वक अभिषेक सुरू होईल, त्यानंतर मध्यरात्री महाअभिषेक होईल. यावेळी श्री कृष्णाला 1000 लिटर पंचामृताने स्नान घालण्यात येईल, ज्यामध्ये दूध, मध, दही, तूप आणि साखरेसह इतर अनेक पदार्थ असतील.
भक्तांना चांदीच्या कलशात पंचामृत अर्पण करून स्नान सोहळ्यात सहभागी होण्याचा बहुमान मिळेल. मध्यरात्री सुरू होणाऱ्या महा अभिषेकामध्ये मुख्य पुजारी आणि निवासी भक्त यांच्यासह इतरही भाविक सामील होऊ शकतील. त्यानंतर श्री श्री राधा मदनमोहनजींची आरती होईल.
7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री महाअभिषेक, महाआरती आणि 108 वस्तूंचा प्रसाद श्री कृष्णाला चढवला जाईल. त्यानंतर 8 सप्टेंबर रोजी, दुपारी 12:30 वाजता पुष्पा अभिषेक, श्रील प्रभुपादजींची आरती, त्यानंतर विशेष 1008 भोग अर्पण असा कार्यक्रम असेल. दुपारी 1:30 वाजता मंदिराच्या सभामंडपात.विशेष मेजवानीचे आयोजन केले आहे व यामध्ये भाविक सहभागी होऊ शकतात. (हेही वाचा: Krishna Janmashtami 2023 Date: श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)
दरम्यान, मुंबईच्या जुहू येथील इस्कॉन मंदिरातही जन्माष्टमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाईल. या ठिकाणी 7 सप्टेंबर रोजी सकाळी 4.30 वाजता मंगल आरती होईल त्यानंतर 7.15 वाजता शृंगार दर्शन असेल. पुढे दुपारी 12.वाजता राजा भोगा आरती. त्यानंतर दुपारी 3 वाजता कलश अभिषेक व 7 वाजता संध्या आरती असे. त्यानंतर रात्री 11 वाजता महाअभिषेकाला सुरुवात होईल. त्यानंतर मध्यरात्री 1 वाजता (8 सप्टेंबर) महा आरती असेल.