Janmashtami 2020 Dress Ideas: श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त लहान मुलांना कृष्ण आणि राधेच्या रुपात कसे तयार कराल? जाणून घ्या काही सोप्या टिप्स
Kids dressed as Lord Krishna | File Photo

श्रावण महिन्यातील कृष्ण जन्माष्टमी चा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो. यंदा उद्या म्हणजे 11 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी असून 12 ऑगस्टला दहीहंडीचा सण साजरा होणार आहे. मुंबईत मोठमोठ्या दहीहंड्या बांधून भव्य सेलिब्रेशन केले जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे या उत्साहावर पाणी पडले आहे. त्यामुळे राज्यातील दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच राज्यातील मंदिरं देखील बंद आहेत. त्यामुळे घरच्या घरी पूजा करुन यंदा गोकुळअष्टमी साजरी करावी लागणार आहे. काही मंदिरांमध्ये ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. (मुंबई मध्ये श्री कृष्ण जन्मोत्सव पूजा लाईव्ह स्ट्रिमिंगच्या द्वारा भाविकांसाठी खुली असेल; कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर निर्णय)

कृष्ण हे सर्वांचे लाडके दैवत आहे. त्यामुळे श्रीकृष्ण जयंती निमित्त लहान मुलांना/मुलींना कृष्णाचा पारंपारिक पोशाख घालून सजवले जाते. तर मुलींना राधाच्या रुपात नटवले जाते. या मुलांमध्ये बाळ कृष्णाचे रुप पाहून त्यांची पूजा केली जाते. तुम्हालाही तुमच्या मुलांना कृष्ण-राधेच्या वेशात तयार करायचे आहे. तर यासाठी काही सोप्या आयडियाज:

कृष्णाच्या रुपात लहान मुलांना कसे सजवाल?

कृष्णाचा पोशाख: लहान मुलांसाठी कृष्णाचा पोशाख बाजारात मिळतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रेस खरेदी करु शकता. धोती, सदरा, मध्ये बांधण्यासाठी पट्टी असा हा पोशाख असतो. सुती किंवा रेशमी व्रत्रात हा ड्रेस तुम्हाला मिळेल.

कृष्णाचे मुकूट: मुकूट देखील बाजारात उपलब्ध असतं किंवा तुम्ही ते घरी ही तयार करु शकता. तसंच मोराचं पिसं अत्यंत महत्त्वाचं. त्याशिवाय कृष्णाचं रुप पूर्ण होणार नाही. आजकाल मोरपिस लावलेली पट्टी बाजारात मिळते. त्यामुळे लहान मुलांना घालण्यासाठी ही पट्टी अत्यंत सोयीस्कर ठरते. कार्डबोर्ड, कापडाचा तुकडा किंवा स्टोनवर्कच्या साहाय्याने तुम्ही घराच्या घरी मुकूट बनवू शकता.

श्रीकृष्णाचे दागिने: माळा, हार, कंगन, बाजूबंद इत्यादी आभूषणांनी तुमच्या चिमुकल्यांना नटवा. महत्त्वाचे म्हणजे कृष्णाच्या कपाळावर टिळा लावायला अजिबात विसरु नका.

बासरी: हातात छोटीशी बासरी द्या आणि मटकी समोर बसून तुमच्या चिमुकल्याचे गोंडस रुप कॅमेऱ्यात कैद्य करा.

राधेच्या रुपात लहान मुलींना कसे नटवाल?

राधेचा पोशाख: लेहंगा घाला किंवा पारंपारिक साडी नेसवा.

राधेचा श्रृंगार: हलकासा मेकअप करुन राधेचे रुप साकारा. मेकअप पावडर, लायनर, काजळ, लिपस्टिक लावून बेसिक मेकअप करा. सुंदरशी टिकली लावून मेकअप पूर्ण करा.

राधेचे दागिने: कानात झुमके, हातात बांगड्या, पायात पैंजण, गळ्यात हार, केसात गजरा माळून तुमच्या मुलीला नटवा.

यंदाच्या कृष्ण जन्माष्टमी निमित्त तुमच्या मुलाला किंवा मुलीला छान सजवून-नटवून फोटो काढा. तुमच्या बाळाची ही पहिलीच जन्माष्टमी असेल तर हा सण खास करा. हे फोटोज, आठवणी तुमच्या सोबत कायम राहतील आणि आनंद देतील.