कोजागिरी पोर्णिमा Photo Credits : pexels.com

नवरात्रीच्या काळात उपवासाचं विशेष महत्त्व असतं. श्रद्धेचा भाग आणि आरोग्य जपण्यासाठी अश्विन पौर्णिमा विशेष महत्त्वाची असते. शरद ऋतूचा काळ हा प्रकोप पित्ताचा काळ असतो. वातावरणात महत्त्वाचे बदल होत असतात, सूर्याची किरण प्रखर असतात. त्यामुळे अनेक आजार वाढतात. अशावेळेस शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी दूध आणि चंद्राचं चांदणं महत्त्वाची भूमिका पार पाडतं.

निसर्गाप्रमाणे शरीरातही वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्र स्थितीमध्ये असताना मोकळ्या जागेत बसावं. थंडगार मसाला दूध पिण्याची प्रथा सुरू झाली आहे. कोजागिरी पोर्णिमा जागवण्यासाठी अनेक ठिकाणी संगीताचे, गप्पा, मैफिलीचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

म्हणून दिला जातो 'जीवेत शरद शतम' चा आशीर्वाद

अनेकदा तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी 'जीवेत शरद शतम' अशा शुभेच्छा दिल्याचं अनुभवलं असेल. यामागे तुम्ही दीर्घायुषी व्हावं असा संदेश लपलेला आहे. कारण आयुर्वेदानुसार, शरद ऋतूला आजारांची जननी असं समजलं जातं. शरद ऋतूमध्ये तुम्ही आजारांचा सामना करू शकलात तर पुढील वर्षभरासाठी तुमचा आरोग्याच्या दृष्टीने काळ प्रबळ जाऊ शकतो. शरद ऋतूमध्ये आरोग्याच्या रोगप्रतिकारक्षमतेची कसोटी लागते. त्यामुळे या काळात प्रामुख्याने आरोग्य जपावे.

दूध - पूर्ण अन्न

दूधामध्ये नैसर्गिकरित्या थंडावा आणि शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांचा समावेश असतो. यामुळे दूध हे पूर्ण अन्न समजले जाते. कोजागिरीच्या रात्री चंद्र, चांदण्याची शीतलता शरीराला मिळावी म्हणून त्याच्या छायेखाली बसून दूध आटवून ते पिण्याचा सल्ला दिला जातो.

दूधामध्ये साखर, सुकामेवा, जायफळ, वेलची,केशर मिसळून दूध बनवले जाते. मधुमेहींनी साखरयुक्त दूध टाळावे. तसेच मनुका आंबट असल्याने दूधात त्याचा थेट समावेश करणंदेखील टाळा. यामुळे दूध नासते.