Ganeshotsav 2021 Dates: हरतालिका, ज्येष्ठा गौरी पूजन ते अनंत चतुर्दशी यंदा गणेशोत्सवात पहा महत्त्वाच्या दिवसांच्या तारखा!

महाराष्ट्रात यंदा पार्थिव गणपती पूजन (Ganpati Pujan) 10 सप्टेंबर दिवशी होणार आहे. त्यामुळे यंदा 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. दरवर्षी गणेश चतुर्थी पूर्वी तृतीयेला हरितालिका पूजन (Hartalika Puja) करून पुढील दहा दिवस गणेशभक्त आनंदामध्ये साजरे करतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरात गौरी-गणपतीचं पूजन (Gauri-Ganpati Pujan)  करून दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसांनी त्यांचं विसर्जन करण्याची प्रथा आहे. यावर्षी देखील गणेशोत्सव कोरोना संकटामुळे साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मग अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पहा हरितालिकेपासून अनंत चतुर्दशी पर्यंत कोणते महत्त्वाचे दिवस आहेत, कोणत्या दिवशी कोणता विशेष दिवस असणार आहे. (नक्की वाचा: Ganeshotsav 2021: लालबागचा राजा ते पुण्याचा दगडूशेठ गणपती, यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या कुठे घेऊ शकाल बाप्पाचं दर्शन; इथे पहा!).

हरितालिका

हरितालिके दिवशी शिव पूजन करण्याची प्रथा आहे. यंदा 9 सप्टेंबर दिवशी हरितालिका पूजन केले जाईल. या दिवशी इच्छित वर मिळावा म्हणून कुमारिका आणि स्त्रिया दिवसभर उपवास करतात.

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी यंदा 10 सप्टेंबरला साजरी केली जाईल. या दिवशी पार्थिव गणपती पूजन करण्याची प्रथा आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपती यांची या दिवशी प्राणप्रतिष्ठा होते.

ऋषीपंचमी

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पंचमी ही ऋषिपंचमी असते. यंदा 11 सप्टेंबर दिवशी ऋषिपंचमी साजरी केली जाणार आहे.

ज्येष्ठा गौरी आवाहन

ज्येष्ठा गौरी आवाहन यंदा 12 सप्टेंबर दिवशी होणार आहे. या दिवशी सकाळी 9.39 नंतर गौरींचं आगमन होऊ शकते.

ज्येष्ठा गौरी पूजन

ज्येष्ठा गौरी पूजन यंदा 13 सप्टेंबर दिवशी होणार आहे. या दिवशी सवाष्ण महिला गौरी पूजन करुन एकमेकींना ओवसं देतात.

ज्येष्ठा गौरी आणि गणपती विसर्जन

यंदा ज्येष्ठा गौरी आणि गणपती विसर्जन 14 सप्टेंबरला होणार आहे. घरगुती 5 दिवसाचे आणि गौरी-गणपती विसर्जन देखील गणपती एकाच दिवशी विसर्जित होतील.

अनंत चतुर्दशी

अनंत चतुर्दशीचा सण यंदा रविवारी 19 सप्टेंबर दिवशी आहे. अनंत चतुर्दशी हे व्रत श्रीकृष्णाने युधिष्ठीराला दिले होते त्याच्या प्रीत्यर्थ हे व्रत केले जाते.

गणेशोत्सवात यंदा सलग दुसर्‍या दिवशी कोरोना संकट घोंघावत असल्याने हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. गणेशोत्सवामध्ये एकमेकांना भेटण्याची परवानगी आहे पण अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन आहे.