Gajanan Maharaj Prakat Din | File Image

Gajanan Maharaj Prakat Din 2024: जन्म कधी झाला असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे उत्तर मिळणार आहे. कारण त्यांचा जन्म हे कोडं आहे. गजानन महाराज हे एक भारतीय हिंदू गुरू होते, जे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या गावात प्रकट झाले अशी मान्यता आहे. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार महाराज प्रकट झाले तो दिवस 23 फेब्रुवारी 1878 होता. त्याच्या प्रकट दिनाची तारीख एक शुभ दिवस मानली जाते आणि म्हणून हा दिवस  प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकट दिनाच्या  दिवशी श्री गजानन महाराजांच्या मंदिरातून पालखी काढली जाते आणि त्यांच्या पादुकाचे  पूजन केले जाते. ज्या दिवशी गजानन महाराज दिसले तेव्हा ते 18 वर्षांचे होते. त्या वेळी ते शेगावातील देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. बिरुदुराजू रामराजू नावाच्या एका लेखकाने ‘आंध्रा योगुलु’ नावाच्या पुस्तकात गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण असल्याचे लिहिले आहे.

प्रकट दिनाची तिथी 

पारंपारिक हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, श्री गजानन महाराज प्रकट दिन दरवर्षी माघा कृष्ण पक्ष सप्तमी तिथीला किंवा माघ महिन्यातील चंद्राच्या अस्त होण्याच्या अवस्थेत सातव्या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी, रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी गजानन महाराज प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. यंदा श्री संत गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन आहे.

प्रकट दिन साजरा करण्याची पद्धत 

प्रकट दिनाच्या दिवशी शेगावमध्ये हजारो लोक प्रार्थना करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी येतात. पूजा, दान, सत्संग, प्रार्थना आणि अन्नदान हे उत्सवाचे भाग आहेत. शेगावच्या श्री गजानन महाराजांना दत्तगुरु आणि श्री गणेशाचे अवतार मानले जाते. त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे अवतारही मानले जातात. मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार 8 सप्टेंबर 1910 ला समाधी घेऊन संपवला.