उद्याच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 13 (Friday 13th) तारखेचा योगायोग जुळून आल्याने अनेक ठिकाणी अंधश्रद्धा आणि भीतीयुक्त अशा अनेक कथा पसरायला सुरुवात झाली आहे. या दिवसाशी संबंधित अनेक अंश्रध्दाळु समजुती आहेत खरंतर या भीतीला इंग्रजीमध्ये 'Paraskevidekatria Phobia' म्ह्णून ओळखले जाते. हा योगायोग अनेक वर्षांपासून सर्वात अशुभ मानला जाणारा दिवस आहे. असं म्हणतात की जगभरात हा दिवस इतका वाईट मानला जातो की या दिवशी काही जण महत्वाची कामे तर सोडाच पण घरातून बाहेर निघणे देखील टाळतात.(आश्चर्यम्! DFO कार्यालयाने जारी केलेले पत्र- 'साईबाबांचा हा संदेश 13 लोकांना फॉरवर्ड करा आणि मिळावा प्रमोशन'; शासकीय वर्तुळात खळबळ)
विशेषतः पश्चिमेकडील देशांमध्ये या योगायोगाविषयी अनेकांच्या मनात भीती आहे, अनेकजण तर फक्त हा दिवसच नाही तर 13 आकड्यापासून देखील लांब राहण्याचा प्रयत्न करतात, म्हणूनच घर, रस्ते बिल्डिंग किंवा हॉटेलच्या रूमनंबर मध्येही हा आकडा नसेल याची खास काळजी घेतली जाते, काही बिल्डिंगमध्ये तर 12 व्या मजल्यानंतर थेट 14 वा मजला असतो. पण याविषयी थेट कोणताही ग्रह मनात ठेवण्याऐवजी यामागचा खरा इतिहास आणि या समजुती मागील कारणे जाणून घ्या..
का अशुभ मानला जातो शुक्रवार १३ चा दिवस?
ख्रिश्चन लोकांचा धर्मग्रंथ बायबल मध्ये शुक्रवार आणि 13 तारखेच्या योगायोगाचा खास उल्लेख आहे. या दिवशी येशू ख्रिस्तांना फाशीवर चढवले होते. एका ब्रिटिश वेबसाईटच्या माहितीनुसार, 1993 मध्ये इंग्लंड च्या एका मेडिकल जर्नल मध्ये देखील या दिवसाचा उल्लेख होता, यादिवशी सर्वाधिक दुर्घटना होतात असे देखील जर्नल मध्ये सांगण्यात आले होते. असं असलं तरी वैज्ञानिक वा अधिकृतरीत्या
याबाबतची कोणतीच पुष्टी केलेली नाही.
काय आहे या दिवसाचा इतिहास?
1- नार्स मिथकाच्या माहितीनुसार, एकदा 12 देवतांसाठी एक शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये एक 13 वा पाहुणा विना आमंत्रण पोहचला होता, त्याच्या येण्याने संतुलन बिघडले. या पाहुण्याचे नाव लोकी असे होते.
2- एका अन्य आख्ययिकेमध्ये येशू ख्रिस्त यांचा शिष्य जुडास हा मेजवानीत 13 वा पाहुणा असल्याचेच सुद्धा मानले जाते. या शिष्याने येशूंची फसवणूक केली. तसेच यादिवशी येशूंना फाशीवर सुद्धा चढवण्यात आले होते. म्हणूनच या दिवसाला अशुभ मानले जाते.
3- 19व्या शतकात अमेरिकेत शुक्रवार हा फाशीचा दिवस म्हणून ओळखला जात होता. यादिवशीच सर्व गुन्हेगारांना फाशी दिली जात होती. त्यामुळे शुक्रवार आणि त्यातही 13 तारीख हा मृत्यूचा दिवस म्हणून ओळखला जात असे.
4- 1307 साली शुक्रवारी 13 तारखेला फ्रान्समध्ये शेकडो लोकांची हत्या झाली होती. हे लोक नाईट टेम्पलर म्हणून काम करत होते. याबाबत 2003 साली लिहिलेल्या द विंची कोड मध्ये देखील उल्लेख आहे.
5- हा योगायोग अशुभ म्हणून इतका जास्त पसरला आहे की यावर फ्रायडे द 13th नामक एक हॉरर चित्रपट सुद्धा आला होता. हा सिनेमा इतका हिट झाला की परिणामी याचे सलग १२ भाग प्रदर्शित करण्यात आले होते. मात्र जेव्हा सिनेमाचा 13 वा भाग प्रदर्शित करायचा होता तेव्हा प्रदर्शनाची तारीख 13 आणि शुक्रवार असा योग धरून ठरवण्यात आली होती. मात्र काही ना काही कारणावरून ही तारीख पुढे जात राहिली आणि अंतिमतः निर्मात्यांनी हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय रद्द केला.
दरम्यान, अलीकडे याबाबत अनेक विरुद्ध बाबी निदर्शनास आल्या आहेत. या दिवशी लोक कामाला जाणे टाळत असल्याने अनेक रस्त्यांवर कमीतकमी ट्राफिक असते त्यामुळे साहजिकच रस्ता अपघाताचे प्रमाण घटते, तर दुसरीकडे यादिवशी लोक नवीन वस्तू घेणे टाळतात त्यामुळे या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ठिकाणी सेल ठेवले जातात.
(टीप- हा लेख प्राप्त माहितीनुसार लिहिण्यात आला आहे, याचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही तसेच लेटेस्टली मराठी याची कोणतीही पुष्टी करत नाही)