Christmas 2019: नाताळ सण साजरा करण्यामागची 'ही' कथा तुम्हाला माहित आहे का?
Christmas Celebrations (PC - File Image)

Christmas 2019: संपूर्ण जगात 25 डिसेंबर हा दिवस 'ख्रिसमस' (Christmas) म्हणजेच 'नाताळ' म्हणून साजरा केला जातो. नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवसासाठी ख्रिश्चन बांधव अनेक दिवसांपासून जय्यत तयारी करतात. 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता. त्यामुळे येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस 'ख्रिसमस' म्हणून साजरा करतात. ख्रिश्चन धर्माचे लोक येशू ख्रिस्तांना ईश्वराचा पूत्र मानतात. काही ठिकाणी ख्रिसमस सणाऐवजी 'एपिफनी सण' हा सण 6, 7 किंवा 19 जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मानुसार, नाताळ हा सण 12 दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. इ.स. 345 च्या कालखंडात पोप पहिला ज्युलियसने 25 डिसेंबर हा दिवस 'येशूंचा जन्मदिवस' मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून या दिवशी 'नाताळ' हा सण साजरा करण्यात येऊ लागला. काही ख्रिश्चन बांधव हा सण मध्यरात्री तर काही ख्रिश्चन बांधव सायंकाळीच हा सण साजरा करतात.

नाताळ सणाच्या दिवशी ख्रिश्चन बांधव एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देतात. या दिवशी सर्व ख्रिश्चन बांधव आपल्या घरांना रोषणाई करून घर सजवतात. नाताळ सणामध्ये 'ख्रिसमस ट्री'ला अत्यंत महत्त्व असतं. या दिवशी सूचिपर्णी झाडावर आकर्षक रोषणाई करून ते सजवलं जातं. तसेच या दिवशी सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो. (हेही वाचा - Christmas/New Year Special Trains 2019: नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 43 हिवाळी विशेष गाड्या)

नाताळ सणाच्या दिवशी अनेक गीतं आणि संगीत गायली जातात. तेराव्या शतकाच्या आसपास स्थानिक भाषेमध्ये नाताळची गाणी म्हणण्याची पद्धती विकसित झाली, असे मानले जाते. इंग्रजी भाषेत नाताळची गाणी प्रथम इ. स. 1426 मध्ये गायली गेली. या गाण्यांमध्ये भगवान येशू यांच्या जन्मापासून ते आनंद साजरा करण्याचे विविध विषय समाविष्ट असतात. नाताळच्या दिवशी भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना केली जाते. या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक गर्दी असते. ख्रिश्चन धर्मातील प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मुले नवीन कपडे घालून चर्चमध्ये येतात. भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या केवळ 2.3% आहे. नाताळाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिसमस हा सण आफ्रिका, आग्नेय आशिया, युरोप, अमेरिका अशा जगभरातील सर्व खंडांमध्ये उत्साहाने साजरा केला जातो. भारतात गोव्यामध्ये ख्रिश्चन धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे गोव्यात नाताळ सण दिमाखात पार पडतो.

ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज भेटवस्तू का देतो?

लहान मुलांना आकर्षक वाटणार सांताक्लॉज ख्रिसमसच्या दिवशी सर्वांना भेटवस्तू का देतो? यामागे एक कथा सांगितली जाते. एका नगरात 'निकुलस' नावाचा श्रीमंत माणूस राहत असे. हा माणूस पैशाने तसेच मनानेही श्रीमंत होता. त्याच्या हृदयात सगळयांकरीता दया आणि करूणा होती. तो गरीबांना मदत करत असे. तसेच लहान मुलांना गिफ्ट देऊन आनंद देत असे. मात्र हे काम करताना त्यांना त्यांची ओळख लपवायची होती. त्यामुळे तो आपल्याला कोणी पाहू नये, यासाठी रात्रीच्या वेळी मुलांना भेटवस्तू देत असतं.