Champa Shashti 2019: मार्गशीर्ष महिन्यात 'शुद्ध षष्ठी' ही तिथी 'चंपाषष्ठी' (Champa Shashti) म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवशी 'मल्हारी नवरात्री'ला प्रारंभ होतो. त्यामुळे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत सहा दिवसांची नवरात्र असते. यालाच 'खंडोबाची नवरात्र', (Khandoba Navratri 2019) असे म्हणतात. खंडोबाच्या जेजुरीमध्ये हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. जेजुरीला खंडोबाचे मोठे मंदिर आहे. येथे काही खंडोबा भक्त चंपाषष्ठीला मनोभावे खंडोबाची पूजा करतात. यंदा 2 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी साजरी केली जाणार आहे. यादिवशी अनेक जण चंपाषष्ठी साजरी करतात. मात्र यातील अनेकांना यामागची कथा माहिती नसते. तुम्हालाही यामागची कथा जाणून घ्यायची असेल तर हा लेख नक्की वाचा...(Khandoba Navratri 2019: सहा दिवस थाटात साजरी होते खंडोबाची नवरात्री; जाणून घ्या चंपाषष्ठीचे महत्व आणि पूजा विधी)
चंपाषष्ठी महत्त्व आणि कथा -
चंपाषष्ठीच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन 'मणी' व 'मल्ल' दैत्यांचा वध केला होता. 'मल्हारी मार्तंड' हा महादेवाचा अवतार होता. ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना तुमचा कोणीही वध करू शकणार नाही, असा वर दिला होता. त्यानंतर मणी आणि मल्ल या राक्षसांनी लोकांना त्रास द्यायला सुरूवात केली. त्यानंतर या त्रासाला कंटाळून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले 7 कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर हल्ला केला. त्यानंतर मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याचा पराभव केला. त्यावेळी मणी राक्षसाने शरण येऊन 'माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहूदे', अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर भगवान शंकरांनी त्याला तसा वर दिला.
मणी राक्षसाचा वध केल्यानंतर मार्तंड भैरवाने मल्ल राक्षसाचाही पराभव केला. त्यानंतर मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला. माझे नाव तुमच्या नावाआधी जोडले जावे, अशी मागणी केली. त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसास आशिर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड, असे म्हटले जाऊ लागले. या दिवशी मल्हारी मार्तंड देवतेला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच कुत्र्यांना खंडोबाचा अवतार मानला जातो. त्यामुळे या दिवशी कुत्र्यांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो.