येत्या 29 ऑक्टोबर 2024 रोजी 9 वा आयुर्वेद दिवस (Ayurveda Day 2024) साजरा करण्यासाठी आयुष मंत्रालयाने पूर्ण तयारी केली आहे. यावर्षी जगभरातील 150 हून अधिक देश आयुर्वेद दिनाची तयारी करत आहेत. यंदाचा हा दिन ‘जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवकल्पना’, या थीमवर साजरा केला जात आहे. या निमित्ताने आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) येथे एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री प्रतापराव जाधव यांनी आयुर्वेद दिनाच्या महत्त्वाविषयी सांगितले की, आयुर्वेद दिन हा आता जागतिक उपक्रम बनला आहे.
आयुर्वेद दिन 2024 च्या थीमची रूपरेषा सांगताना ते म्हणाले की, या वर्षीच्या आयुर्वेद दिनाच्या उत्सवाची थीम जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेदाच्या योगदानाला नवीन आयाम देते. लोकांच्या कल्याणासाठी आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर एक मजबूत वैद्यकीय प्रणाली म्हणून प्रचार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने देशभरात एक महिन्याचा कार्यक्रम सुरू केला आहे.
सध्या, आयुर्वेदाला जगभरातील 24 देशांमध्ये मान्यता आहे, तर आयुर्वेद उत्पादने 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. या वर्षीच्या कार्यक्रमात आयुर्वेदाला जागतिक आरोग्य नवोपक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवून स्टार्टअप्स आणि उद्योगांचा लक्षणीय सहभाग दिसेल. आयुर्वेद दिवस दरवर्षी धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशी) च्या पवित्र प्रसंगी साजरा केला जातो. 2016 मध्ये स्थापन झाल्यापासून आयुर्वेद दिनाला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (हेही वाचा: Diwali Festival 2024 Dates: दिवाळीची पहिली आंघोळ, भाऊबीज कधी? पहा यंदा दिवाळीच्या 5 दिवसांच्या सेलिब्रेशनच्या तारखा)
याआधी 2016 मध्ये, भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने धन्वंतरी यांचा जयंती दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिन म्हणून घोषित केला. 28 ऑक्टोबर 2016 रोजी प्रथमच पहिला आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. या वर्षीचा उत्सव ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला आहे, ज्याचा समारोप 29 ऑक्टोबर 2024 रोजी होईल. या संपूर्ण महिनाभरात देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले जात असून, आरोग्य संवर्धन आणि रोग प्रतिबंधक यांमध्ये आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.