Vitthal Rukmini (Photo Credit: Twitter/@PandharpurVR)

आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2023) निमित्त पंढरपूर (Pandharpur) येथे श्री विठ्ठल-रुक्मीणी दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. यापुढे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा (Government Mahapuja) सुरु असताना विठ्ठलाचे मूखदर्शन (Shri Vitthal Rukimini Mandir Mukh Darshan) सुरु राहणार आहे. राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल (24 जून) एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचा निर्णय झाला. यापूर्वी शासकीय महापूजा सुरु होण्यापूर्वी मंदिर काही काळ बंद असायचे. त्यामुळे वारकरी आणि भक्तांना पांडुरंगाचे दर्शन मिळायचे नाही. मात्र, विद्यमान सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतल्याने भाविकांचा मूखदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विठ्ठलाच्या शासकीय महापूजेची राज्याला जुनी परंपरा आहे. आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री महापूजा करतात. तर कार्तीकी एकादशीला राज्याचे उपमुख्यमंत्री महापूजा करतात. राज्याला जेव्हा उपमुख्यमंत्री नसतात. तेव्हा मुख्यमंत्री किंवा इतर कोणी महापूजा करत असते. गेली कित्येक वर्षे हीच परंपरा चालत आली आहे. मात्र, महापूजेदरम्यान मंदिर बंद होत असल्याने भाविकांना विठ्ठर दर्शन घेण्यास विलंब लागत होता. त्यामुळे अनेक भाविक नाराज होत असत. त्यामुळेच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. (हेही वाचा, Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तारीख, पूजा विधी आणि महत्व)

आषाढी एकादशी महापूजा हा पंढरपूर येथे पार पडणारा एक महत्त्वाचा शासकीय कार्यक्रम आहे. आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री विठ्ठल रखुमाईची सपत्नीक महापूजा करतात. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवांचा मेळा भरलेला असतो. त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि इतर प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. पूजेचे मुख्य केंद्र पंढरपूरचे विठोबा मंदिर आहे, जे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी विविध शहरे आणि गावांमधून दिंड्या येतात. दिंडीत भजन, कीर्तन, अभंग गायले जातात आणि विठोबाला समर्पित संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या (पालखी) वाहून नेण्यात येतात.