Bharadi Devi Temple Pic Credit:- Anganewadi Temple

कोकणवासियांसाठी महत्त्वाची एक जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा (Anganewadi Bharadi Jatra). दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे आता यंदाच्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जाहीर झाली आहे. यंदा ही जत्रा 2 मार्च 2024 दिवशी असणार आहे. एका गावातील ही जत्रा असली तरीही देशा-परदेशातील भाविक आर्वजून त्यासाठी कोकणात दाखल होतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण (Malvan) तालुक्यातील मसुरे (Masure) गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत ‘भराडी देवी’आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव ‘भराडी देवी’ असं ठेवण्यात आलं आहे. अशी आख्यायिका आहे.

आता आंगणेवाडीच्या जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्यानंतर भराडी देवीचं मंदिर आज 26 ते 28 डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे.या दरम्यान मंदिरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. अवघ्या दीड दिवसाच्या जत्रेसाठी लाखो लोकं कोकणात येतात. देवीची पूजा करतात आणि प्रसादाचा आनंद घेतात. सामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते, मराठी अभिनेते, अभिनेत्री देखील या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात. (नक्की वाचा: यंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवी जत्रेला तुम्ही मालवण मध्ये कसे पोहचाल?).

आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून एकत्र तयार करत असतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला या प्रसाद दिला जातो. या जत्रेला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष ट्रेन सोडल्या जातात. सिंधुदुर्गात एसटी महामंडळाकडूनही विशेष बस चालवल्या जातात.