Photo Credit - @PBNS India

New Delhi: कोविड प्रतिबंधासाठी (Covid 19) भारताने विकसित केलेल्या जगातील पहिल्या नाकावाटे घ्यायच्या  लसीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थे (CDSCO) कडून 18 आणि त्यावरील वयोगटासाठी आपत्कालीन परिस्थितीत मर्यादित वापराला मान्यता मिळाली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी आज नवी दिल्लीत जैवतंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ही माहिती दिली. दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोलॉजी येथे ही बैठक झाली. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला कोविडसाठी जगातील पहिली नाकावाटे घेण्याची लस विकसित करण्यासाठी  जैवतंत्रज्ञान विभागाने केलेल्या मदतीबद्दल डॉ जितेंद्र सिंह यांनी कौतुकाची थाप दिली.

डॉ जितेंद्र सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत ऐतिहासिक आणि वेगळ्या प्रकारचा निर्णयही घेतला. बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिल (ब्रिक) ही सर्वोच्च स्वायत्त संस्था  तयार करण्यासाठी डीबीटीच्या 14 स्वायत्त संस्थांचा समावेश त्यात करण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे. (हे देखील वाचा: Mumbai Measles Outbreak: मुंबईत आज गोवरचे 23 नवीन रुग्ण आढळले, आजारामुळे एकूण 15 जणांचा मृत्यू)

जैवतंत्रज्ञान संशोधनाचा जास्तीत जास्त प्रभाव पाडण्यासाठी केंद्रीकृत आणि एकीकृत प्रशासनाचा हेतू त्यामुळे साध्य होईल. डीबीटी संस्थांनी विकसित केलेल्या संशोधनाच्या पायावर, डीबीटीचे वेगळे संशोधन आदेश कायम ठेवत ब्रिक समन्वय वाढवेल आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमांप्रमाणे अत्याधुनिक संशोधन हाती घेईल, असे त्यांनी सांगितले.