TikTok मुळे सापडला 3 वर्षांपूर्वी सोडून गेलेला पती; तृतीयपंथी साठी सोडले होते पत्नी आणि दोन मुलींना
TikTok Video मुळे सापडला सोडून गेलेला पती (संग्रहित-संपादित प्रतिमा)

Tamil Nadu: टिकटॉकचे (TikTok) दुष्परिणाम, यामुळे झालेले अपघात, याबाबत कोर्टात उभा राहिलेला खटला अशा अनेक गोष्टींमुळे लोकप्रिय झालेल्या या App चे काही फायदेही होऊ शकतात. तर या टिकटॉकमुळे एका महिलेला आपला 3 वर्षांपूर्वी सोडून गेलेला पती सापडला आहे. सुरेश (Suresh) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला दोन मुलीही आहेत. तीन वर्षांपूर्वी तो घर सोडून गेला होता, त्यानंतर आता टिकटॉकच्या माध्यमातून सुरेशच्या पत्नीला आपल्या पतीची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू राज्यातील सुरेश आणि जयाप्रदा यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या जोडप्याला दोन मुलीही झाल्या होत्या. त्यानंतर 2016 साली सुरेश अचानक बेपत्ता झाला. खूप शोधाशोध करूनही सुरेशची काही माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर जयाप्रदाने पोलिसांतही तक्रार केली होती, मात्र तरी सुरेशचा काहीच पत्ता लागला नाही. कौटुंबिक कारणामुळे सुरेशने घर सोडले असावा असा अंदाज बांधण्यात आला होता. (हेही वाचा: TikTok व्हिडिओ बनवण्यासाठी दोन तरुणांची पूलावरुन उडी, एकजण बेपत्ता)

काही दिवसांपूर्वी जयाप्रदा हिच्या एका नातेवाईकाला टिकटॉकवर सुरेश दिसला. एका महिलेसोबतचा व्हिडीओ त्याने या App वर पोस्ट केला होता. ते पाहून त्यांनी याबाबत जयाप्रदाला कळविले. तिने तो व्हिडीओ पोलिसांना दाखविला. व अखेर या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी सुरेशला ताब्यात घेतले. सुरेश हा एका तृतीयपंथी व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, याच व्यक्तीसाठी सुरेशने घर सोडले असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. सुरेशला ताब्यात घेतल्यानंतर जयाप्रदा आणि सुरेश या दोघांचेही समुपदेशन करून, दोघांना एकत्र राहण्यास भाग पाडले गेले आहे.