आजच्याच दिवशी सुमारे 7 वर्षांपूर्वी पूनम राणा (Poonam Rana) नावाची महिला पोटदुखीची तक्रार घेऊन बंगळुरू (Bengaluru) शहरातील मणिपाल हॉस्पिटलमध्ये आली होती. त्यावेळी तिला काय माहित की ती पुन्हा हॉस्पिटलमधून घरी जाऊ शकणार नाही. 7 वर्षांपासून ती कोमात होती आणि अखेर मंगळवारी तिने अखेरचा श्वास सोडला. ओटीपोटात दुखू लागल्याने पूनम राणा यांना ऑक्टोबर 2015 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. मात्र अधिक तपासात डॉक्टरांना पुनमची समस्या गंभीर असल्याचे आढळून आले. त्यांना 2 ऑक्टोबर 2015 रोजी MICU (मेडिकल इंटेन्सिव्ह केअर युनिट) मध्ये दाखल करण्यात आले. यादरम्यान ती कोमात गेली.
डेक्कन हेराल्डच्या वृत्तानुसार, मणिपाल हॉस्पिटलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, “गेल्या सात वर्षांत त्याच्या काळजीमध्ये कोणतीही कपात झालेली नाही. त्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या. सर्व प्रयत्न करूनही 24 मे 2022 रोजी दुपारी 12 वाजता आजारपणामुळे त्यांचे निधन झाले.
उपचारादरम्यान 9.5 कोटी रुपयांचे देण्यात आले बिल
पूनम दिल्लीची रहिवासी होती आणि एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होती. बंगळुरूमध्ये स्थायिक झालेल्या केरळमधील रहिवासी रेगिश नायरशी तिचे लग्न झाले होते. दोघांनाही अपत्य नव्हते. नायर (36) यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला तेव्हा ती खोल कोमात होती. नायर सांगतात की उपचारादरम्यान त्यांना 9.5 कोटी रुपयांचे बिल देण्यात आले, त्यापैकी 2 कोटी रुपये त्यांनी दिले. (हे देखील वाचा: Rape: धक्कादायक ! जन्मदात्या पित्याचा 6 वर्षीय मुलीवर बलात्कार)
याआधी अरुणा शानबाग 42 वर्षे कोमात होत्या, त्यांचे 18 मे 2015 रोजी वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. 1973 मध्ये मुंबईतील केईएम रुग्णालयात अरुणावर बलात्कार झाला होता. हा जघन्य गुन्हा करणारा वॉर्ड बॉय सोहनलाल याने अरुणाला मारण्याचा प्रयत्न केला. अरुणाने बाहेर पडण्यासाठी बरीच ताकद लावली, पण मानेच्या नसांवर दबाव आल्याने ती बेशुद्ध पडली आणि कोमात गेली. त्यानंतर त्या कधीच बऱ्या होऊ शकल्या नाही.