सध्या कायदा किती महिलांच्या बाजूने आहे याची आज परत एकदा प्रचीती आली. लग्नानंतर महिलांना आजही सासरच्या मंडळींकडून अनेक प्रकारच्या छळाचा सामना करावा लागतो. कधी हुंड्यावरून तर कधी इतर काही कारणावरून. याबाबत अनेकवेळा सासरची मंडळी महिलांना त्रास देऊन घराबाहेर काढतात. याबाबत तक्रार करायची असेल तर ती त्याच गावात करावी लागते, याबाबतच सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे. यामुळे अशा महिलांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळणार आहे.
सासरच्या मंडळींनी हाकलून दिल्यानंतर ती महिला ज्या ठिकाणी राहत असेल त्या ठिकाणीही आपल्या पती विरोधात अथवा इतर मंडळींच्या विरोधात तक्रार अथवा केस दाखल करू शकते, हा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने आज दिला. सासरच्या मंडळींकडून अत्याचार झाल्यानंतर तिथून बाहेर पडलेली महिला कुठूनही कलम 498ए अंतर्गत ही तक्रार दाखल करू शकते. मग ती जागा तिच्या आई वडिलांचे घर असो वा वर्तमानमध्ये ती राहत असलेले कोणतेही ठिकाण. (हेही वाचा: आता 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या महिलाही ठरू शकतात पोटगीसाठी पात्र : सुप्रीम कोर्ट)
याआधी ज्या ठिकाणी अत्याचार झाला आहे त्याच ठिकाणी तक्रार नोंदवणे बंधनकारक होते. मात्र आज सुप्रीम कोर्टाने या नियमात बदल केला आहे. याबाबत मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.