Fodder Scam: 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सध्या तयारीला लागले आहेत. मात्र, यादरम्यान राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआय (CBI) ने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
लालूंना झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सध्या तुरुंगाबाहेर आहे. यापूर्वी चारा घोटाळा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने लालूंना मोठा दिलासा दिला आहे. 27 मार्च रोजी न्यायालयाने सीबीआयने त्यांच्या जामीनाविरोधात केलेली याचिका फेटाळली होती. तेव्हा न्यायालयाने सांगितले की, असाच एक खटला आधीच प्रलंबित आहे. (हेही वाचा - Government Official and Bigamy: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पुनर्विवाहाबाबत उच्च न्यायालयाची महत्वाची टिपण्णी; म्हणाले- 'पहिली पत्नी असताना दुसरे लग्न...')
झारखंड उच्च न्यायालयाने 22 एप्रिल 2022 रोजी चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांना जामीन मंजूर केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालू सध्या जामिनावर बाहेर आहेत. झारखंड उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या बाजूने निकाल दिल्यास येत्या काही दिवसांत लालूंना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते. यावर सुनावणी होण्यापूर्वी तेजस्वी यादव यांचे वक्तव्यही समोर आले आहे. तेजस्वी यादव गुरुवारी संध्याकाळी दिल्लीहून पाटण्याला पोहोचले. लालूप्रसाद यादव यांच्याबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर तेजस्वी म्हणाले की, काही फरक पडत नाही. आम्ही घाबरणारी किंवा नतमस्तक होणारे लोक नाही.