West Bengal: पश्चिम बंगाल पोलिसांनी मंगळवारी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हसनाबाद येथे एका महिला रुग्णाला भूल देण्याचे इंजेक्शन देऊन बलात्कार केल्याप्रकरणी एका डॉक्टरला अटक केली. पीडित महिला आणि तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे डॉक्टरला अटक करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस सूत्रांनी सांगितले. महिलेने तक्रारीत आरोप केला आहे की, काही दिवसांपूर्वी तिचा नवरा बाहेरगावी गेला असताना ती आरोपी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली होती. तक्रारीनुसार, डॉक्टरांनी तिला आधी बेशुद्ध केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर आरोपी डॉक्टरने पीडितेचे बेशुद्ध अवस्थेत काही फोटोही काढले. यानंतर आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेलही केले.
आरोपी डॉक्टरने तिला ब्लॅकमेल करून अनेकवेळा बलात्कार केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन डॉक्टरने तिच्याकडून सुमारे चार लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.
सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने पीडितेने सुरुवातीला हा प्रकार कोणाला सांगितला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळी तिचा नवरा बाहेरगावी असल्याने आपल्याला असहाय्य वाटत असल्याचेही तिने सांगितले.
मात्र, तिचा पती नुकताच घरी परतल्यानंतर तिने त्याला संपूर्ण घटना सांगितली. पतीने तिला धीर दिला आणि पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितले, तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली. अहवाल दाखल करतेवेळी आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर केले असता सरकारी वकिलांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. जिल्हा पोलिस सूत्रांनी सांगितले की, पीडितेचे गोपनीय जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवावे लागणार आहे.