उन्हात अंडरवेयर वाळत घालणे पडले महाग,सामाजिक कार्यकर्ते मास्टर विजय सिंह यांच्यावर गुन्हा दाखल
Image For Representations (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझ्झफरनगर (Muzzafarnagar) भागात मागील 24 वर्षांपासून भ्रष्टाचार, भूखंडमाफिया या सारख्या समस्यांवर लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मास्टर विजय सिंह (Master Vijay Singh) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, यामागील कारण तर अगदी विश्वास न बसण्यासारखं आहे. झालं असं की, मुझ्झफरनगर येथील शिव चौक येथे धरणे आंदोलन देत असताना याठिकाणी अंडरवेयर उन्हात वळत घातलेली दिसून आली. आंदोलन करताना एका सार्वजनिक ठिकाणी असे करणे हे विजय सिंह यांना शोभत नाही हे परिसरातील महिलांना लाजवण्याचे काम आहे असा आरोप करत संजय कुमार यांनी याप्रकरणी सिंह यांच्याविरुद्ध तातडीने तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. मास्टर विजय सिंह यांच्यावर सिव्हिल लाईन कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विजय सिंह यांनी प्रतिक्रिया देताना अंडरवेअर वळत घालण्यावरून केलेला आरोप हा आंदोलनातून परावृत्त करण्याचा प्रयत्न आहे असे म्हणत काहीही झालं तरी आपण आपले आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. याचप्रमाणे ज्या अंडरवेअरवरून हा सर्व गदारोळ झाला टी आपली नसून जवळच राहणाऱ्या एका निराधार व्यक्तीची होती असेही सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुझ्झफरनगर येथे आंदोलन करत असताना जिल्हा दंडाधिकारी सेल्जा कुमारी यांनी विजय सिंह यांना आंदोलनातून उठवले होते, त्यानंतर शिव चौक येथे सिंह यांनी पुन्हा आंदोलन सुरु केले. मात्र आपला आवाज दाबण्यासाठी हे आरोपाचे कारस्थान रचले जात आहे असे सिंह यांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशातील विजय सिंह यांच्या नावे आजवरचे सर्वाधिक काळ टिकणारे आंदोलन करण्याचा विक्रम आहे.