कानपूर येथे पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 12 डबे रुळावरून घसरले, अनेकजण जखमी
Howrah-New Delhi Poorva Express Derails in Kanpur (Photo Credits: ANI)

भारतीय रेल्वे बदलत आहे, एकीकडे नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे तर दुसरीकडे रेल्वेच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे. तरी आज पहाटे उत्तर प्रदेश येथे रेल्वेचा एक अपघात घडला आहे. हावडावरून दिल्लीला (Howrah to New Delhi) जाणाऱ्या पूर्व एक्स्प्रेसचे (Poorva Express) 12 डबे रुळावरून घसरले आहेत. सकाळी साधारण 1 वाजता कानपूर (Kanpur) येथील रूमा गावाजवळ हा अपघात घडला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

काल रात्री हावडा येथून नवी दिल्लीकडे पूर्वा एक्सप्रेस (12303) कूच करत होती. कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ रेल्वेचे 12 डबे रुळावरून घसरले. या डब्यांमध्ये 8 एसी कोच आणि पेंट्रीचा समावेश आहे. ही माहिती मिळताच ताबडतोब जिल्हाधिकारी, एसएसपी, 30 अँब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा: दसऱ्याच्या मुहूर्तावर मृत्यूचे तांडव: रेल्वेने चिरडून तब्बल 60 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी)

एनडीआरएफच्या 45 जणांची टीम या ठिकाणी असून, प्रशासनाने बाचाव कार्य सुरु करून, अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु झाले. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान रेल्वे प्रशासनाने हावडा येथे हेल्पलाइन नंबर जारी केला असून, (033) 26402241, 26402242, 26402243, 26413660 या नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले आहे.