प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

पाकिस्तानी दहशतवादी संघटना भारतावर आणि अफगाणिस्तानवर आतंकवादी हल्ले सुरूच ठेवणार असल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर खात्याने दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून भारतावर मोठा दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी माहितीही अमेरिकन गुप्तचर खात्याने दिली आहे. यासाठी भारताने सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. भारतासह दहशतवाद्यांच्या निशाण्यावर अफगाणिस्तानदेखील आहे, त्यामुळे तिथेही मोठा आतंकवादी हल्ला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. सिनेटच्या निवड समितीसमोर गुप्तचर खात्याने आपला अहवाल सादर केला, त्यातून ही माहिती मिळाली आहे. या अहवालात विविध देशांचे संबंध, आतंकवादी हल्ले, हिंसाचार यांच्या शक्यता वर्तवल्या आहेत.

(हेही वाचा : दहशतवादी संघटनांचे नवे हत्यार; तरुणांना दहशतवादाकडे आकर्षिक करण्यासाठी ‘हनी ट्रॅपिंग’ सुरु)

गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स या बाबत माहिती देताना म्हणाले, ‘आतंकवादाविरुद्ध पाकिस्तानचा व्यवहार हा फार संकुचित आहे. ज्या देशांपासून पाकिस्तानला धोका असतो त्या देशांवर हल्ला करणे हेच पाकिस्तानचे शस्त्र आहे. परंतु पुढे जाऊन त्या दहशतवादी संघटनांपासून पाकिस्तानलाच खरा धोका आहे.’ याचसोबत येणारी निवडणूक भाजपाने हिंदुत्ववाद्याच्या मुद्यावरून लढली तर भारतात मोठी सांप्रदायिक हिंसा उफाळू शकते असेही या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एटीएसने (ATS) मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा (Mumbra) येथून चार तर औरंगाबाद (Aurangabad) येथून पाच अशा एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले होते. हे नऊ जण आयएसआय या दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलवर काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.