UPSC Representational Image (Photo Credits: PTI)

UPSC Exam 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने यूपीएससी पूर्व परीक्षा (UPSC Pre-Exam) पुढं ढकलणं अशक्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही उमेदवारांनी यूपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वाच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, आता आयोगाने परीक्षा घेण्यासंदर्भातील आपली भूमिका मांडताना पूर्व परीक्षा पुढे ढकलणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशातील शाळा तसेच महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती. याशिवाय महाविद्यालयीन परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यावेळी यूपीएससीच्या परीक्षादेखील लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र, आता आयोगाने यूपीएससीच्या परीक्षासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केलं आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार, येत्या 4 ऑक्टोबर रोजी यूपीएससीची पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

उमेदवारांकडून यूपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वाच्च न्यायालयात न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आरोगाने आपली बाजून मांडताना सांगितलं की, पूर्व परीक्षेसाठी संपूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलणं अशक्य आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला परीक्षा घेण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याच्या सूचना दिल्या. (हेही वाचा- UPSC Exams 2020: यूपीएससी च्या पूर्व, मुख्य परीक्षा देणार्‍यांना परीक्षा केंद्रामध्ये बदल करता येणार; upsconline.nic.in वर अशी आहे प्रक्रिया)

दरम्यान, या याचिकेवर पुढील सुनावणी बुधवारी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी होणार आहे. देशातील लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाने 31 मे रोजी होणारी 'यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2020' पुढे ढकलली होती. देशातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील तारीख जाहीर केली जाईल. परीक्षेची नवी तारीख जाहीर करताना उमेदवारांना किमान 30 दिवस अगोदर कळवण्यात येईल, असं आयोगाने उमेदवारांना यापूर्वी सांगितलं होतं.