State Women Commission: उत्तर प्रदेशमधील महिला आयोगाने दिलेला प्रस्ताव मान्य झाल्यास उत्तर प्रदेशात (Up State) महिलाच्या कपड्यांचे माप पुरुष टेलर घेऊ शकणार नाहीत. पुरुषांना महिलांचे केस देखील कापता येणार नाहीत. पुरूषांचे वाईट हेतू आणि चुकीच्या स्पर्शापासून महिलांचे रक्षण करण्यासाठी राज्य महिला आयोगाने याबाबतचा प्रस्ताव दिला आहे. गेल्या महिन्यात महिला आयोगाची बैठक झाली होती. त्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावांवर राज्य सरकारने कायदा मंजूर करावा, अशी विनंती आम्ही करू, असे आयोगाच्या (State Women Commission) सदस्य हिमानी अग्रवाल यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने महिलांना ‘बॅड टच’पासून संरक्षण देण्यासाठी आणि पुरुषांचे वाईट हेतू थांबवण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे. यानुसार पुरुषांनी (मेल टेलर) महिलांचे कपडे शिवू नयेत किंवा केस कापू नयेत. हा प्रस्ताव राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बबिता चौहान यांनी मांडला, त्याला बैठकीत उपस्थित इतर सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या महिला आयोगाच्या बैठकीनंतर अशा अनेक सूचना करण्यात आल्या, ज्यात पुरुषांना महिलांचे माप घेऊ न देणे, दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदींचा यामध्ये समावेश होता. सध्या हा केवळ प्रस्ताव असून महिला आयोग यासंदर्भात कायदा करण्याची विनंती नंतर राज्य सरकारला करणार आहे. महिला आयोगाचे नियम पाळले जातील याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल.

या संदर्भात यूपी महिला आयोगाच्या सदस्य हिमानी अग्रवाल यांनी शुक्रवारी बोलताना सांगितले, नुकत्याच झालेल्या महिला आयोगाच्या बैठकीत महिलांनी परिधान केलेल्या कपड्यांचे माप फक्त महिला टेलरने घ्यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तसेच दुकानात सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी देखील करण्यात आली होती.

हिमानी अग्रवाल यांच्या माहितीनुसार, सलूनमध्ये फक्त महिला कर्मचाऱ्यांनी महिला ग्राहकांची काळजी घ्यावी. कारण, या प्रकारच्या व्यवसायात असलेल्या पुरुषांमुळे महिलांचा विनयभंग होतो, असे आमचे मत आहे. पुरुष गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. काही पुरुषांचे हेतूही चांगले नसतात. मात्र, सर्वच पुरुषांचे हेतू वाईट असतात असे नाही, असेही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बबिता चौहान म्हणाल्या की, महिला ज्या जिममध्ये जातात, तेथे महिला प्रशिक्षक असायला हवेत. सर्व जिम ट्रेनर्सची पोलीस पडताळणी करावी. जर एखाद्या महिलेला पुरुष प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तिला ते लेखी द्यावे लागेल.

जिममध्ये जाणाऱ्या महिला आणि मुलींच्या शोषणाच्या तक्रारी महिला आयोगाकडे सातत्याने येत असून, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ज्या दुकानात महिलांचे कपडे शिवले जातात, तेथे माप घेण्यासाठी महिला टेलरची नियुक्ती केली आहे. याची खात्री करावी. इतकेच नाही तर ज्या स्कूल बसमध्ये मुली प्रवास करतात त्या बसमध्ये महिला कर्मचारी असाव्यात. सध्या महिला आयोगाने सर्व जिल्ह्यांना याबाबतचे आदेश दिले आहेत. जो मान्य करणार नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.