Representational Image (Photo Credits: File Image)

वाराणसीत एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्जामुळे त्रस्त झालेल्या एका व्यावसायिकाने पत्नी, मुलगा आणि मुलगी यांची हत्या करुन स्वत: आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत्यू होण्यापूर्वी व्यावसायिकाने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली होती. हे कुटुंब 23 दिवसांपासून आत्महत्येची तयारी करत होतं, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे वाराणसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चेतन तुळस्यान (वय, 45) नावाचे व्यावसायिक वाराणसी शहरातील आदमपूर भागातील नचनी कुआ परिसरात राहत होते. चेतन यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर आई-वडील आणि वरच्या मजल्यावर चेतनची पत्नी रितू , मुलगा हर्ष आणि मुलगी हिमांशी राहत होते. शुक्रवारी पहाटे चेतन यांनी पोलिसांना फोन करुन मी कुटुंबासह आत्महत्या करत असल्याचे कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी चेतन यांना पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. पोलिसांनी शोध लावत चेतन यांचे घर शोधून काढले. मात्र, चेतनचे वडील रवींद्रनाथ यांनी दरवाजा उघडून सर्व काही ठिक असल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी वरच्या मल्यावर जाऊन दरवाजा वाजवला. मात्र, कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी हर्षा आणि हिमांशी आतल्या खोलीत पलंगावर पडले होते. तर दुसर्‍या खोलीतील रितूचा मृतदेह पलंगावर पडलेला होता. तसेच चेतनचा मृतदेह फासावर लटकत होता. (हेही वाचाा - रेल्वे रुळांशेजारी कचऱ्याला लागलेल्या आगीदरम्यान खोळबंळलेल्या लोकलमध्ये वृद्ध महिलेला आला हृदयविकाराचा झटका)

दरम्यान, पोलिसांना चेतनच्या खोलीत झोपेच्या औषधाची बाटली तसेच 12 पानांची सुसाईड नोट सापडली. ही सुसाईड नोट चेतन यांच्या पत्नी रितूने लिहिली होती. व्यवसायात नुकसान आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या करावी लागत असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. तसेच पप्पा, आम्हाला झोपेच्या गोळ्या द्या आणि त्यानंतर आमचा गळा दाबा, असं त्यांच्या मुलांनी या सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. या धक्कादायक प्रकारामुळे आदमपूरा भागात खळबळ उडाली आहे. वाराणसी पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.