अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलं 125 रुपये किंमतीच्या नाण्याचे लोकार्पण
(Photo Credit - ANI )

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बुधवारी दिल्ली येथे 125 रुपये किंमतीच्या नाण्याचे लोकार्पण केलं. प्रसिद्ध योगी परमहंस योगानंद यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त हे नाणे जारी करण्यात आले आहे. यावेळी अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूरही उपस्थित होते. परमहंस योगानंद हे सेल्फ-रियलायजेशन फॅलोशिपचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 1893 मध्ये गोरखपूरमध्ये झाला होता. त्यांनी लिहिलेली अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. योगानंद यांच्या  ‘Autobiography of a Yogi' या आत्मचरित्राची जगभरात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. योगानंद यांनी योगाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी भारताबाहेर जावून योगाचा प्रचार-प्रसार केला. त्यासाठी योगानंद यांनी 'योगदा सत्संग सोसाईटी ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केली.  (हेही वाचा - Telecom Sector मधील तब्बल 40 हजार नोकऱ्यांवर येणार गदा, कंपनी करोडो रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी कठोर पाऊल उचलणार)

एएनआय ट्विट  - 

काय आहेत नाण्याची वैशिष्ट्ये?

  • नाण्याच्या समोरील बाजूला ‘अशोकचक्र’ हे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे.
  • या नाण्यावर हिंदीमध्ये ‘भारत’ तर इंग्रजीमध्ये ‘इंडिया’सह 125 रूपये छापलं आहे.
  • या नाण्याचे वजन 35 ग्रॅम इतकं आहे.
  • नाण्याच्या दुसऱ्या बाजूला परमहंस योगानंद यांचे छायाचित्र छापले आहे.
  • तसेच नाण्यावर ‘परमहंस योगानंद यांची 125 वी जयंती’ आणि त्यांच्या जन्म-मृत्यूचे वर्ष नमूद करण्यात आले आहे.
  • हे नाणे तयार करण्यासाठी 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकल आणि 5 टक्के जस्तचा वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, निर्मला सितारामन यांनी परमहंस योगानंद यांच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी सितारामन म्हणाल्या की, योगानंद यांनी भारताची मान उंचावली. त्यांनी जगभरातील लोकांना मानवतेविषयी जागृत करण्याचे काम केले. परमहंस यांचा जन्म 1893 मध्ये गोरखपूर येथे झाला होता. त्यांनी 'योगी कथामृत' हा ग्रंथ लिहिला.