आयटी कंपनी ग्रिड्स इंडिया प्रा. लि. (IT Grids India Pvt Ltd) यांच्या विरोधात तेलंगणा (Telangana) आणि आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) 7.8 कोटीपेक्षा अधिक जनतेचा आधार डेटा चोरी केल्याप्रकरणी हैद्राबाद सायबरबाद पोलिसांनी (Cyberabad Police) एफआयआर (FIR) दाखल केली आहे. या प्रकरणी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (Unique Identification Authority of India) यांनी तक्रार नोंदवली होती.
तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यातील एकूण लोकसंख्या अंदाजे 8.4 कोटी इतकी आहे. ग्रिड्स इंडिया प्रा.लि. यांच्याकडे टीडीपीचा सेवा मित्र अॅप बनवण्याचे काम देण्यात आले होते. या अॅपच्या कामादरम्यान हा डेटा चोरीला गेल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. तक्रारीमध्ये नमूद केल्याप्रमाणे हा आधार डेटा एका रिमूव्हेबल स्टोरेज डिव्हाईसच्या माध्यमातून काढून घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
हार्ड डिस्क अॅनालिसिसनुसार, आंध्रप्रदेश आणि तेलंगानातील सुमारे 78,221, 397 लोकांच्या आधार कार्डच्या नोंदी कंपनीकडे होत्या. तेलंगाना स्टेट फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटरी (Telangana State Forensic Science Laboratory) च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी कंपनीकडे असलेल्या डेटाबेसची साईझ UIDAI कडे असलेल्या डेटाएवढीच आहे.
9-सदस्यीय विशेष तपासणी पथक (एसआयटी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूआयडीएआयचे हैद्राबाद येथील डेप्युटी डिरेक्टर भवानी प्रसाद यांनी शुक्रवारी आधार कायदा, 2016 च्या संबंधित कलमाखाली मधापुर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
रिपोर्टनुसार, सेवा मित्र अॅपद्वारे चोरी केलेल्या आधार डेटाचा वापर राजकीय प्रचार, मतदार यादीतून मतदारांचे नाव कमी करण्यासाठी करण्यात येणार होता. या दरम्यान आयटी कंपनीचे सीईओ अशोक देवाराम (Ashok Dakavaram) यांना अटक केल्याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.