Toll Tax Hike from 1st April 2023: देशभरात पुन्हा एकदा टोल टॅक्स (Toll Tax) वाढणार आहे. 31 मार्चच्या रात्रीपासून अनेक ठिकाणी टोल महागणार आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार आहेत. काही ठिकाणी टोल वाढवण्यात आला असून 1 एप्रिलपासून यूपी, पंजाब, राजस्थानसह इतर राज्यांमध्ये टोल टॅक्समध्ये वाढ शक्य आहे. आता राजधानी दिल्लीला जाणे-येणही महाग होणार आहे. टोलच्या जास्त किंमतीमुळे तुम्हाला लोकल पाससाठी जास्त पैसे मोजावे लागतील.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) 1 एप्रिलपासून टोलचे दर वाढवू शकते. ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग (NHs) आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणार्यांच्या खिशाला नेहमीपेक्षा अधिक कात्री लागण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, टोलच्या किमती 5% ते 10% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा - Ujjwala Yojana LPG Subsidy: 9 कोटींहून अधिक महिलांना मोदी सरकारचं गिफ्ट; एलपीजीवर सबसिडी जाहीर)
राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 नुसार, शुल्क दर दरवर्षी 1 एप्रिलपासून सुधारित केले जातील. अशा स्थितीत गरजांच्या आधारे वेळोवेळी टोलच्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत.
छोट्या वाहनांवर किती कर लागणार?
कार आणि हलक्या वाहनांसाठी टोल दर 5% वाढण्याची अपेक्षा आहे आणि इतर अवजड वाहनांसाठी 10% पर्यंत टोल वाढू शकतो. अलीकडेच सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेसाठी टोलचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या नव्याने उघडलेल्या विभागावरील टोल 2.19 रुपये प्रति किलोमीटर आहे आणि तो सुमारे 10% वाढेल.
सध्या द्रुतगती मार्गावरून दररोज सुमारे 20 हजार वाहने ये-जा करतात. पुढील सहा महिन्यांत हा आकडा 50,000-60,000 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे आणि दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेसाठी टोल दर वाढण्याची अपेक्षा आहे.
मासिक लोकल पासमुळेही चिंता वाढणार -
टोल प्लाझाच्या 20 किलोमीटर परिसरात राहणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा मासिक पास 10% ने वाढण्याची अपेक्षा आहे. नवीन टोल दरांसह, NHAI चा महसूल वाढवणे आणि रस्ते वापरकर्त्यांना चांगली सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, यामुळे नागरिकांच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे.
यूपी, राजस्थानमध्येही टोल वाढणार -
उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग-9 काही वर्षांपूर्वीच सुरू झाला असून त्यावर अनेक वेळा टोल वाढवण्यात आला आहे. यामुळे दिल्ली, गाझियाबाद, नोएडा येथील लोकांना पिलखुवा येथील चिजारसी टोल प्लाझावर जास्त टोल भरावा लागतो. हा टोल ओलांडूनच लोक हापूर, रामपूर, मुरादाबादला जातात. आता याशिवाय कानपूरकडे जाताना, कानपूर-औरैया महामार्गावर बारा गावाजवळ सुरू असलेल्या टोल प्लाझावर 31 मार्चच्या मध्यरात्री 12 पासून टोल टॅक्समध्ये वाढ होणार आहे.
त्याचबरोबर राजस्थानमधील राष्ट्रीय महामार्गावर 1 एप्रिलपेक्षा जास्त रक्कम भरून टोल टॅक्स द्यावा लागणार आहे. NHAI राजस्थानमध्ये 95 पेक्षा जास्त टोल बुथ चालवते. यातील बहुतांश दर 31 मार्चच्या मध्यरात्री 12 पासून टोल बूथवर सुधारले जात आहेत. पंजाबमध्येही 1 एप्रिलपासून टोल टॅक्स वाढवला जाणार आहे.