Delhi IAS Transfer: मनीष सिसोदिया यांच्यावरील CBI छाप्यानंतर काही तासांतच 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Photo Credits: PTI)

Delhi IAS Transfer: उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेबद्दल सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या निवासस्थानावर छापा (CBI Raid) टाकल्यानंतर शुक्रवारी 12 आयएएस अधिकाऱ्यांची (IAS Officers) बदली करण्यात आली. दिल्ली सरकारच्या सेवा विभागाने जारी केलेल्या बदलीच्या आदेशानुसार, ज्यांची बदली करण्यात आली आहे त्यात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे विशेष सचिव उदित प्रकाश राय यांचा समावेश आहे.

भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये एका कार्यकारी अभियंत्याला अन्यायकारकरित्या फायदा मिळवून देण्यासाठी 50 लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून दिल्लीच्या नायब राज्यपालांनी राय यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली होती. या आदेशानुसार, राय यांची प्रशासकीय सुधारणा विभागात विशेष सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. (हेही वाचा - Himachal Chakki Railway Bridge Collapsed: हिमाचल आणि पंजाबला जोडणारा चक्की रेल्वे पूल कोसळला; Watch Video)

सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर आणि अधिकाऱ्यांच्या 30 ठिकाणी छापे टाकले. सिसोदिया यांच्या निकटवर्तीयाच्या कंपनीला कथितपणे 1 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. परंतु सिसोदिया यांनी असे म्हटले आहे की, त्यांनी काहीही चुकीचे केले नाही आणि सीबीआय तपास आणि छाप्यांमुळे ते घाबरले नाहीत.

सीबीआयनेही अबकारी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्यासह 17 जणांनाचा आरोपी म्हणून उल्लेख केला आहे. त्यांच्यावर सरकारी तिजोरीची फसवणूक आणि कंत्राटदारांना लाभ दिल्याचा आरोप आहे. एफआयआरमध्ये पहिले नाव सिसोदिया यांचे आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "स्वतंत्र भारताचे सर्वोत्कृष्ट शिक्षण मंत्री" मनीष सिसोदिया यांच्यावर वरच्या आदेशानुसार आम्हाला त्रास देण्यासाठी छापे टाकण्यात आले. ही पावले भारताला नंबर वन बनवण्याच्या त्यांच्या मोहिमेतील अडथळे आहेत. परंतु, त्यांच्यामुळे ते थांबणार नाहीत. शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिवसभर शांतता होती. त्याचवेळी रस्त्यावर प्रसारमाध्यमांची गर्दी झाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने मथुरा रोडवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचवेळी पोलिसांनी बॅरिकेड लावून सर्व्हिस रोड बंद केला.