Ayodhya Ram Mandir: राम मंदिर परिसर 70 एकर ते 107 एकर पर्यंत वाढविण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राने रामजन्मभूमी संकुलाजवळ 7,285 चौरस फूट जमीन खरेदी केली आहे. एका ट्रस्ट अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, उत्तर प्रदेशातील पवित्र शहर अयोध्यामध्ये भव्य मंदिर बनवणाऱ्या ट्रस्टने 7,285 चौरस फूट जमीन खरेदीसाठी प्रति वर्गफूट 1,373 रुपये दराने 1 कोटी रुपये दिले आहेत.
विश्वस्त अनिल मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिर बांधण्यासाठी आम्हाला अधिक जागेची आवश्यकता असल्याने आम्ही ही जमीन खरेदी केली आहे. ट्रस्टने खरेदी केलेली ही जमीन अशरफी भवनाजवळ आहे. त्याचवेळी फैजाबादचे उपनिबंधक एस.बी. सिंह म्हणाले की, जमीन मालक दीप नरैन यांनी ट्रस्टचे सचिव चंपत राय यांच्या बाजूने 20 फेब्रुवारी रोजी 7,285 चौरस फूट जागेच्या नोंदणीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. तसेच मिश्रा आणि आपना दलाचे आमदार इंद्र प्रताप तिवारी यांनी साक्षीदार म्हणून कागदपत्रांवर सही केली. फैजाबाद येथील उपनिबंधक एस.बी. सिंह यांच्या कार्यालयात ही नोंदणी करण्यात आली. (वाचा - Ram Mandir Bhumi Pujan: सुरेश रैना, बबिता फोगाटसह क्रीडापटुंनी अयोध्या राम मंदिर भूमिपूजनसाठी दिल्या शुभेच्छा; गौतम गंभीरने भारतीयांसाठी दिला 'हा' संदेश)
सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रस्टची अधिक जमीन खरेदी करण्याची योजना आहे. यासाठी राम मंदिर संकुलाजवळ मंदिरे, घरे आणि रिक्त मैदानाच्या मालकांशी चर्चा सुरू आहे. राम मंदिर ट्रस्टला 107 एकरांवर विस्तारित भव्य मंदिर संकुल बांधायचे आहे आणि त्यासाठी आत्ता 14,30195 चौरस फूट अधिक जमीन खरेदी करावी लागेल. पाच एकर जागेवर मुख्य मंदिर बांधले जाईल आणि उर्वरित जमीन संग्रहालये आणि ग्रंथालयासाठी वापरली जाईल.