मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदौर (Indore) जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका खाजगी रुग्णालयात बाळंतीण महिलेसोबत गैर व्यवहार करण्यात आला आहे. या महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, हॉस्पिटल स्टाफमधील एका नर्सने या बाळंतीण महिलेच्या कानाखाली मारली आहे. इतकेच नाही तर, 'असे काय खाल्ले ज्यामुळे तब्बल 4.5 किलो वजनाचे बाळ जन्माला आले' म्हणत तिचा अपमान देखील केला. नेहा सारड़ा असे या महिलेचे नाव असून, नर्सच्या निष्काळजीपणामुळे या मुलाचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. न्यूज 18 ने याबाबत वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी, नातेवाईकांनी डिलिव्हरीसाठी नेहाला राजमोहल्ला येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बराचवेळ रुग्णालयात कोणीच कर्मचारी आला नाही. अखेर 2 तासांनंतर गरोदर नेहाला अनेक इंजेक्शन्स देण्यात आली. वेदना कमी होत नाहीत हे पाहून तिला डिलिव्हरीसाठी नेण्यात आले. गेल्या 9 महिन्यांपासून नेहा डॉक्टर वंदना तिवारी यांच्याकडून उपचार घेत होती. कुटुंबीयांनी नर्सला डॉक्टर वंदना यांना बोलावण्याची विनंती केली तेव्हा, नर्सने नेहाला थप्पड मारत असे काय खाल्ले की ज्यामुळे साडेचार किलो वजनाचे बाळ जन्माला आले अशी विचारणा केली. (हेही वाचा: महिलेने नॉर्मल डिलिव्हरीद्वारे दिला तब्बल 7 मुलांना जन्म; बाळ-बाळंतीण सुखरूप)
प्रसूतीनंतर नर्सने नेहाच्या पतीला सांगितले की, बाळाच्या हृदयाचे ठोके चालू आहेत पण कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला व बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टर जाफर पठाण यांनी सांगितले की, डिलीव्हरीच्या वेळेस निष्काळजीपणा मुळे ही स्थिती झाली आहे. त्यानंतर बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, मात्र शुक्रवारी त्याचे निधन झाले. याबाबत बोलताना डॉक्टर वंदना म्हणाल्या, ‘कुटुंबाच्या सल्ल्याने नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रात्री 11 वाजता डिलिव्हरीला सुरुवात झाली व रात्री अडीच वाजता मुलाचा जन्म झाला. त्यानंतर बालरोगतज्ञांच्या सल्लाानुसार त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र नर्सने नेहाला मारल्याबद्दल मला काहीच माहिती नाही.’