देशातील पहिले बिटकॉइन एटीएम (Photo Credits: Twitter)

बंगळूरू येथे देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी एटीएम सुरु करण्यात आले होते. हे देशातील पहिले बिटकॉइन एटीएम असल्याने याची बरीच चर्चाही रंगली होती. मात्र अवघ्या आठवड्याभरात या एटीएमला टाळे लागले आहे. पोलिसांनी हे एटीएम विना परवाना सुरु करण्यात आल्याचे सांगून, एटीएम सुरु करणाऱ्या युनोकॉइन टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक हरीश बाबी यांना बंगळूरू पोलिसांनी अटक केली असून, त्यांना 1 आठवडा तुरुंगात टाकले गेले आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी 1 टेलर मशीन, 2 लॅपटॉप, 1 मोबाईल, आणि 1 लाख 80 हजार रोख रक्कम जप्त केली आहे.

केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्येच बँका, वित्तीय संस्थाना क्रिप्टोकरन्सी देवघेव करण्यावर बंदी घातली होती. या निर्णयामुळे फक्त विदेशी बँकातून खाती असणारे ग्राहकच क्रिप्टोकरन्सीची देवघेव करू शकत होते. त्यामुळे प्रत्यक्ष भारतातील बिटकॉइनचे अस्तित्व संपल्यातच जमा होते. त्यावर युनीकॉइनने क्रिप्टोकरन्सी भन्नाट असा एटीएमचा मार्ग काढला होता. ही कंपनी 30 प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करत. यातून ग्राहक रोज 1 हजारापासून 10 हजार पर्यंत देवघेव करू शकत होते. मात्र आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर एटीएम कोणाचीही परवानगी न घेता उघडण्यात आले होते. त्यामुळे तत्काळ पोलिसांकडून हे एटीएम बंद करण्यात आले आहे.

भारतात क्रिप्टोकरन्सीचे 13 लाख वापरकर्ते असून गुंतवणुकीसाठी ते क्रिप्टोकरन्सी खरेदी करतात. मात्र या प्रकरणानंतर बिटकॉइनच्या नादात या अशा फसव्या लोकांच्या जाळ्यात फसू नका असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.