Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Guidelines: देशात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्र सरकारही अलर्ट मोडवर आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी दुपारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना सतर्क राहण्याचा आणि COVID-19 व्यवस्थापनासाठी पूर्णपणे तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना 10 आणि 11 एप्रिल रोजी सर्व रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांबाबत मॉक ड्रिल घेण्यास सांगितले आहे. याशिवाय 8 आणि 9 एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकाऱ्यांनाही आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा -COVID-19 Death in Mumbai: मुंबई मध्ये 78 दिवसांनंतर पुन्हा कोविड 19 ने दगावला रूग्ण; Comorbidities असल्याची रूग्णालयाची माहिती)

तथापी, आता पुद्दुचेरीमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी ई वल्लवन म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक ठिकाणे, समुद्रकिनारी रस्ते, उद्याने आणि चित्रपटगृहांमध्ये आता मास्क घालणे आवश्यक आहे. याशिवाय रुग्णालये, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, दारूची दुकाने, आदरातिथ्य आणि मनोरंजन क्षेत्रे, सरकारी कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य आहे.

दरम्यान, देशात अवघ्या चार दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची एकूण 6,050 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत. याशिवाय, सक्रिय रुग्णांची संख्या आता 28,303 झाली आहे.

गेल्या 24 तासांत 14 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा 5 लाख 30 हजार 943 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात तीन, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.