Independence Day 2022: दहशतवादी शाहनवाजच्या कुटुंबीयांनी घरावर फडकावला तिरंगा; मुलाला केली 'ही' विनंती
Tricolour (File Image)

Independence Day 2022: दहशतवादी शाहनवाज कंठ (Shahnawaz Kanth) याच्या कुटुंबीयांनी 'आझादी का अमृतमहोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) उपक्रमांतर्गत आपल्या घरावर तिरंगा फडकावला. त्याच्या या कृतीने सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का बसला आहे. कुटुंबातील सदस्यांनी शाहनवाजला एक महत्त्वाचा संदेशही दिला. मुलाने दहशतवादाचा मार्ग सोडून पुन्हा भारतात यावे, अशी इच्छा शाहनवाजच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. आपलं सगळं भारतात आहे. पाकिस्तानशी आपला कोणाताही संबंध नाही, असं स्पष्ट मत कुटुंबीयांनी व्यक्त केलं आहे.

वीस वर्षांपूर्वी शाहनवाज कंठ यांना दहशतवाद्यांनी शाळेतून नेले होते. रविवारी शाहनवाजच्या कुटुंबीयांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला. आपले सर्व काही भारतात आहे. पाकिस्तानशी आपला काहीही संबंध नाही. मुलगा दहशतीच्या दलदलीतून बाहेर यावा यासाठी शाहनवाजच्या कुटुंबियांनी हा संदेश दिला आहे. (हेही वाचा -Independence Day 2022: आपल्या मातीत खूप सामर्थ्य असून भारताचा 75 वर्षांचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे - पंतप्रधान मोदी)

किश्तवाडमधील हुलार गावचे रहिवासी अब्दुल रशीद कंठ आणि त्यांचा दुसरा मुलगा हक नवाज कंठ यांनी रविवारी नगर परिषदेचे अध्यक्ष सज्जाद यांना फोन करून तिरंगा देण्यास सांगितले. नगर परिषदेचे अध्यक्ष सज्जाद तिरंगा घेऊन त्यांच्या घरी पोहोचले आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी अभिमानाने घरी तिरंगा फडकावला. हकनवाज म्हणाले की, शाहनवाजला 2000 साली दहशतवाद्यांनी पळवून नेले होते. वडील अब्दुल रशीद कंठ यांनी दहशतवाद्यांना मुलगा परत करण्याची विनंती केली पण त्याला सोडण्यात आले नाही.

अब्दुल रशीद कंठ यांनी सांगितले की, 2015 पर्यंत मुलाशी अधूनमधून संपर्क होत होता. तेव्हापासून ते आपल्या मुलाशी बोलू शकले नाहीत. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त घरोघरी तिरंगा फडकवल्याने त्यांना अभिमान वाटत आहे. मुलाला विनंती करायची होती की, त्याने कोणत्याही मार्गाने घरी परतावे. या कुटुंबाने फोन करून तिरंगा मागितल्याचे नगर परिषदेचे अध्यक्ष सज्जाद नजर यांनी सांगितले. संपूर्ण कुटुंबाने घरावर तिरंगा फडकवला आहे. शाहनवाज मायदेशी परतावा अशी माझी इच्छा असल्याचे सज्जाद यांनी सांगितले.