Jammu-Kashmir Update: जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान
Security forces (Pic Credit - - ANI Twitter)

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद्यां विरोधातील कारवाईत सुरक्षा दलांना (Security forces) यश मिळाले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियान (Shopian) जिल्ह्यातील किलबल (Kilbal) भागात झालेल्या चकमकीत एक दहशतवादी (Terrorist) मारला गेला आहे. सध्या चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती, त्यानंतर परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. जेव्हा सुरक्षा दलाचे पथक त्या भागात पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला, त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. त्याचवेळी प्रजासत्ताक दिनाच्या तयारीच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये सुरक्षा कोअर ग्रुपची महत्त्वपूर्ण बैठक झाली. हेही वाचा Assembly Elections: रॅली-रोड शोवर निर्बंध कायम, निवडणूक आयोगाच्या बैठकीत निर्णय

यामध्ये सुरक्षेचा आढावा आणि 2022 सालासाठी दहशतवादविरोधी कारवायांचा सामना करण्यासाठी रणनीती तयार करण्याबाबत चर्चा झाली. श्रीनगरमधील लष्कराच्या 15 कॉर्प्स मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या कॉर्पस ग्रुपच्या बैठकीत दहशतवादविरोधी कारवाया, सीमेपलीकडील कारवायांवर कठोर हल्ला आणि नार्को-टेरर आणि टेरर फंडिंग यावर रणनीती तयार करण्यात आली. या बैठकीत हायब्रीड दहशतवाद्यांवरही चर्चा झाली.

तत्पूर्वी, सुरक्षा दलांनी गुरुवारी लष्कर-ए-तैयबाच्या (LET) दहशतवाद्याला जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातून अटक केली आणि त्याच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांना दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सकाळी बडगामच्या चदूरा भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली.