Swiggy (Photo Credits: PTI)

Swiggy to Pay 5,000 for Failure to Deliver : बंगळुरूमधील 'क्रीम स्टोन आईस्क्रीम' आउटलेटमधून गेल्या वर्षी 26 जानेवारी रोजी, बंगळूरुमधील एका ग्राहकाने ‘नटी डेथ बाय चॉकलेट’(Nutty Death by Chocolate) आइस्क्रीमची स्विगी(Swiggy)द्वारे ऑर्डर दिली होती. त्यानंतर आजपर्यंत त्या आईस्क्रीमची डिलिव्हरी ग्राहकाला मिळाली नाही. मात्र, आईस्क्रीमची डिलिव्हरी झाल्याचे स्टेटस ॲपवर दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्राहकाला स्विगीने ऑर्डरची रक्कम देखील परत केली नव्हती. ज्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार घेत ग्राहकाने थेट ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यावर आता ग्राहक न्यायालय (Consumer Court) ने स्विगीला 5 हजारांचा दंड ठोठावत ते ग्राहकाला देण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकरण ग्राहक न्यायालयात जाताच स्विगीने प्रतिवाद करत, स्विगीचा डिलीव्हरी बॉय हा रेस्टॉरंट्स आणि ग्राहकामधला मध्यस्थ आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार दायित्वापासून संरक्षित आहे, असे स्विगीकडून सांगण्यात आले. त्याशिवाय, डिलिव्हरी बॉयला या कथित चुकीसाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही. कारण ऑर्डर वितरित केली गेली की नाही हे तपासण्याचे राईट्स त्याला नाही. विशेषत: जेव्हा ती ऑर्डर ॲपवर वितरित म्हणून चिन्हांकित केले गेले असेल.

दरम्यान, या प्रकरणावर निकाल देताना, अध्यक्ष विजयकुमार एम पवळे, व्ही अनुराधा आणि रेणुकादेवी देशपांडे यांच्या खंडपीठाने स्विगीला चांगलेच फटकारले आहे. या प्रकरणातील नोटीसला उत्तर देण्यात स्विगी अयशस्वी ठरल्याचं त्यांनी म्हटले आहे.माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत उत्तरदायित्वापासून संरक्षित असल्याचा स्विगी कंपनीचा युक्तिवाद नाकारत, सेवेतील कमतरता आणि अनुचित व्यापार पद्धती यासाठी स्विगीवरील आरोप सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे स्विगीला आईस्क्रिमची 187 रक्कम, 3 हजार रूपये नुकसानभरपाई आणि 2 हजार तक्रारदाराला खटल्याचा खर्च असे मिळून एकूण 5 हजर रूपये म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.