Jet Airways च्या 500 कर्मचाऱ्यांना SpiceJet ने दिली नोकरी; 27 नवीन विमाने घेऊन मार्ग वाढवण्याचा मानस
SpiceJet Flight | Image Used for Representational Image Only | (Photo Credits: PTI)

अखेर कर्जबाजारी झालेली विमानसेवा पुरवणारी कंपनी जेट एअरवेज (Jet Airways) बंद झाली. बुधवारी, 17 एप्रिल रोजी कंपनीच्या विमानाने शेवटचे उड्डाण घेतले. जेटला वाचवण्यासाठी नाही कोणत्या बँकेने मदत केली, नाही केंद्र सरकारने यात लक्ष घातले. या गोष्टीचा थेट परिणाम जेटच्या कर्मचाऱ्यांवर झाला. ही कंपनी बंद पडल्याने तब्बल 22,000 कर्मचारी बेकार झाले आहेत. आधीच जेटने कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही, त्यात कंपनी बंद पडली अशावेळी काय करायचे हा प्रश्न प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समोर आहे. मात्र त्यातल्या त्यात सुखावह गोष्ट म्हणजे स्पाइसजेट (SpiceJet) या कंपनीने जेटच्या 500 कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे.

जेटमुळे ज्या लोकांची नोकरी गेली त्यामध्ये पायलट, तंत्रज्ञ, केबिन कर्मचारी आणि ग्राउंड स्टाफ अशा लोकांचा समावेश आहे. यापैकी 500 जणांना स्पाइसजेटने आपल्या कंपनीमध्ये घेतले आहे, यामध्ये 100 वैमानिकांचाही समावेश आहे. आता कंपनीने आपले मार्ग आणि विमानांची संख्या वाढवण्याचा विचार केला आहे. त्यासाठी कंपनी नवी 27 विमाने घेणार आहे. जेट बंद झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्पाइसजेटने हे पाऊल उचलले आहे. (हेही वाचा: अखेर Jet Airways ची सेवा बंद, काल रात्री घेतले शेवटच्या विमानाने उड्डाण; 10 मे रोजी होणार बोली प्रक्रियेवर निर्णय)

स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, आता कंपनी वाढत आहे, त्यामुळे नवी नोकरी देऊ करताना पहिले प्राधान्य जेटच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणार जाईल. दरम्यान गेल्या पाच वर्षांत बंद पडलेली जेट एअरवेज ही देशातील सातवी नागरी हवाई वाहतूक कंपनी आहे. यापूर्वी एअर पेगासस, एअर कोस्टा, एअर कार्निव्हल, एअर डेक्कन, एअर ओडिशा व झूम एअर या विमानसेवा देणाऱ्या कंपन्या बंद पडल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता जेट परत सुरु होईल का नाही यात शंका आहे. मात्र जरी सुरु झाली तर त्याची मालकी नक्कीच दुसऱ्या कोणाकडे तरी असेल.