फक्त भारतातीलच नाही तर जगातील लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून गोवा (Goa) ओळखले जाते. समुद्रकिनारे, पार्टी, चविष्ट अन्न यासोबत दारू (Liquor) अशा अनेक गोष्टींमुळे गोव्यात पर्यटकांची रेलचेल असते. गोव्यात दारू स्वस्त असल्याने अनेक पर्यटक तिथून दारू आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र सध्या दारूच्या फक्त दोन बाटल्या तुम्ही गोव्याबाहेर घेउन येऊ शकता. मात्र लवकरच तुम्ही दोन पेक्षा अधिक दारूच्या बाटल्या घेऊन येऊ शकणार आहात. गोवा सरकार यामध्ये लक्ष घालून सध्याच्या नियमामध्ये बदल करण्याचा विचार करत आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी विधानसभेत बोलताना याबाबत माहिती दिली. गोवा पर्यटन व्यवसायाला पुन्हा उभारी देण्यासाठी गोवा सरकार हा प्रयत्न करणार आहे. गोवा सरकार लवकरच याबाबत शेजारील राज्यातील उत्पादक अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. सध्या विमानाने प्रवास करणारे पर्यटक गोव्यातून दारूच्या प्रती व्यक्ती 2 बाटल्या घेऊन जाऊ शकतात. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या गोवा सीमेवर हे कायदे कडक आहेत.
घाऊक दारू विक्रीवर आकारण्यात आलेल्या विविध उत्पादन शुल्कातून राज्याला सध्या सुमारे 500 कोटी रुपये उत्पन्न मिळत आहे. तर किनारपट्टीवरील या राज्यात किरकोळ दारूची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट्स मध्ये दरवर्षी सुमारे आठ दशलक्ष पर्यटक येतात. पर्यटकांना सध्या एक देशी बनावटीची विदेशी दारूची बाटली आणि स्थानिक दारूची बाटली अशा दोन बाटल्या नेण्याची परवानगी आहे. मात्र यामध्ये वाढ झाली तर गोव्याला मिळणाऱ्या महसुलातही वाढ होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.