धक्कादायक! कौटुंबिक वादात ढवळाढवळ केल्याने पत्नीसह 2 मेहूण्यांना घातल्या गोळ्या; तिघांचा मृत्यू
Firing | (Photo Credits: Pixabay)

नवी दिल्लीतील शकूरपूर (Shakurpur) गावात रविवारी रात्री उशिरा दारूच्या नशेत एका व्यक्तीने घरात अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत आरोपीची पत्नी आणि त्याच्या दोन मेहूण्यांचा जागीच मृत्यू झाला. घरगुती वादात सासरच्या मंडळींच्या हस्तक्षेपामुळे आरोपीला राग आला. त्यामुळे त्याने हे कृत्य केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, शकूरपूर गावात एका फ्लॅटमध्ये 47 वर्षीय हितेंद्र यादव पत्नी सीमा आणि दोन मुलांसोबत राहतात. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूच्या नशेत हितेंद्र सीमाला रोज मारहाण करायचा. रविवारी रात्री उशिरा तो मित्र ललितसोबत मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला. सीमाने जेवण बनवले नाही, म्हणून हितेंद्रने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती सीमाने तिचे भाऊ सुरेंद्र आणि विजय यांना दिली. (वाचा - Suicide: गाझियाबादमध्ये पतीच्या आजारपणाला कंटाळून तीन मुलांसह महिलेची आत्महत्या)

विजय आपली पत्नी बबिता आणि भाऊ सुरेंद्रसह शकूरपूरला पोहोचला. तो हितेंद्रला समजावत होता. कौटुंबिक वादात सासरचे लोक कशा प्रकारे हस्तक्षेप करतात, असे ललितने हितेंद्रला भडकावले. दारूच्या नशेत हितेंद्रने परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आणली आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या घटनेत सीमा, सुरेंद्र, विजय आणि बबिता हे जखमी झाले.

शेजाऱ्यांनी सर्वांना भगवान महावीर रुग्णालयात नेले. जेथे सीमा, सुरेंद्र आणि विजय यांचा मृत्यू झाला. तसेच विजयची पत्नी बबिताची प्रकृती चिंताजनक आहे. हितेंद्र आणि ललित यांना सुभाष प्लेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसेच, मृतदेह शवविच्छेदनासाठी बीएसए रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.