अखेर भाजपचे माजी बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; पाटना-साहिब इथून लढणार निवडणूक
Shatrughan Sinha Joins Congress (Photo Credits: ANI)

भारतीय जनता पार्टी (BJP) चे पाटना-साहिबचे माजी खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचे पाटना इथून तिकीट कापल्यानंतर ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर आज त्यांनी काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मोदी सरकार सत्तेत आल्यावर शत्रुघ्न सिन्हा हे नेहमीच मोदी यांच्याविरोधात बोलत आले आहेत. राफेल बाबतीतही त्यांनी प्रश्न उभे केले होते. म्हणून भाजपाने बिहारमधील एनडीएच्या 40 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. ज्यात पाटना साहिबमधून भाजपाने रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली गेली.

शत्रुघ्न सिन्हा यांच्या काँग्रेस प्रवेशावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांनी जोरदार टीका केली होती. सिन्हा यांची अरुण जेटली यांनी भाजपची डोकेदुखी अशी उपहासात्मक संभावना करत, आमची डोकेदुखी स्वीकारल्याबद्धल काँग्रेस पक्ष आणि नेतृत्वाचे आभारही मानले होते. आता कॉंग्रेस प्रवेशानंतर पाटना साहिबमधून ते रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. (हेही वाचा: काँग्रेस पक्षात शत्रुघ्न सिन्हा यांना अपमान सहन करावा लागणार नाही, सोनाक्षी सिन्हा हिची प्रतिक्रिया)

दरम्यान एका कार्यक्रमा दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडल्यावरुन सोनाक्षी हिला विचारण्यात आले. त्यावेळी तिने भाजप पक्षात राहून अपमान सहन करण्यापेक्षा पक्ष बदल केल्यास उत्तम असे म्हटले होते. यावेळी जयप्रकाश नाराणायण, माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल विधान करत त्यांच्या उपस्थितीत वडिलांना पक्षात कधीच आदराने वागवले नसल्याची खंत सोनाक्षी हिने व्यक्त केली होती.