Firozabad Shocker: फिरोजाबादमधील शाळेत खेळताना गेला दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; हृदयविकाराचा झटका आल्याची शंका
Minor Boy | Representational image (Photo Credits: pxhere)

Firozabad Shocker: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) च्या फिरोजाबाद (Firozabad) मध्ये शाळेत खेळता-खेळता इयत्ता दुसरीत शिकणारा मुलगा जमिनीवर कोसळला. तो शाळेच्या आवारात इतर मुलांसोबत खेळत होता. त्यानंतर धावत असताना तो अचानक जमिनीवर पडला. सोबतच्या मुलांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत मुलाला हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेमुळे मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस स्टेशन दक्षिण भागातील हिमायूनपूर येथील रहिवासी असलेला 8 वर्षीय विद्यार्थी चंद्रकांत हा दुसरीच्या वर्गात शिकत होता. गेल्या शनिवारी दुपारी बारा वाजता अर्धा तास शाळेत दुपारच्या जेवणाचा ब्रेक झाला. यावेळी विद्यार्थी वर्गाबाहेर येऊन खेळत होते. यामध्ये चंद्रकांत यांचाही समावेश होता. (हेही वाचा -Nagpur Stampede at BJP Event: नागपूरातील भाजपच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, एक वृद्ध महिलेचा मृत्यू तर 10 जखमी)

तेवढ्यात चंद्रकांत धावत आला आणि अचानक जमिनीवर पडला. शेजारी उभ्या असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी चंद्रकांतला उचलले. मात्र तो बेशुद्ध अवस्थेत होता. याबाबत विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांना माहिती दिली असता एकच खळबळ उडाली. मुलाला तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (वाचा -Heart Attack In Youth: कमी वयात हार्ट अटॅक कसा टाळाल? मुंबईच्या प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या 6 अनमोल टिप्स!)

सध्या पोलिसांनी विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अहवाल आल्यानंतर विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू कसा झाला हे कळेल. मृत विद्यार्थ्याचे काका प्रमोद कुमार यांनी सांगितलं की, त्यांना शाळेतून पुतण्याचा मृत्यू झाल्याचा फोन आला होता. मुलाच्या शरीरावर रक्ताच्या किंवा जखमेच्या खुणा नाहीत. अशा परिस्थितीत मृत्यू कसा झाला हा तपासाचा विषय आहे. खेळता खेळता मुलगा अचानक पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे शाळेच्या व्यवस्थापकाने सांगितले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.