Inflation (Pic Credit: IANS)

Retail Inflation Rate: किरकोळ महागाईपासून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation Rate) गेल्या वर्षभरातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आज जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई 5.72 टक्क्यांवर आली आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये तो 5.88 टक्के होता.

वास्तविक सध्या संपूर्ण जग महागाईने त्रस्त आहे. दरम्यान, भारतासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. डिसेंबरमध्ये नोंदलेली किरकोळ महागाई गेल्या 12 महिन्यांतील सर्वात कमी आहे. महागाई कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे डिसेंबरमध्ये अन्नधान्याच्या किमती कमी होणे. (हेही वाचा - FD Rate Hike: या बँकेने वाढवले FD वर व्याजदर; गुंतवणूकदार होणार मालामाल; जाणून घ्या किती होणार फायदा)

शहरी भागात CPI (ग्राहक किंमत निर्देशांक) मध्ये मोठी घसरण नोंदवली गेली आहे. नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर 5.68 टक्के होता. तो डिसेंबरमध्ये 5.39 टक्क्यांवर आला. तसेच, ग्रामीण भागातील सीपीआय नोव्हेंबरमध्ये 6.09 टक्के होता, जो ताज्या अहवालात 6.05 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ चलनवाढीचा दर (CPI महागाई) डिसेंबर 2022 मध्ये 5.72 टक्के होता, ज्यामध्ये सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली आहे. याशिवाय, आता महागाईचा दर आरबीआयने ठरवून दिलेल्या मर्यादेत आहे ही मोठी दिलासादायक बाब आहे. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाई दर 4 टक्क्यांच्या खाली नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

महागाई दरात सातत्याने घसरण होत असल्याने आता आरबीआय व्याजदरात बदल करण्याचा विचार करेल अशी अपेक्षा आहे. कारण रेपो दरात सातत्याने वाढ होत असल्याने गृहकर्जासह सर्व प्रकारचे लोकांचे कर्ज महाग झाले आहे. अशा स्थितीत महागाई नियंत्रणात असल्याने आरबीआय आगामी बैठकीत आपल्या निर्णयांवर विचार करू शकते.