अंध तसेच दृष्टिहीन लोकांना चलनातील नोटा आणि नाणी ओळखता यावीत म्हणून रिझर्व्ह बँके (Reserve Bank) कडून एक मोबाईल अॅप तयार करण्यात येणार आहे. हे अॅप विनामूल्य मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येणार आहे, तसेच हे अॅप बनवण्याचे काम अतिशय वेगात चालू असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) देण्यात आली. सध्या रिझर्व्ह बँकेने अनेक नवीन आकाराच्या नोटा आणि नाणी चलनात आणली आहेत मात्र ती ओळखण्यात अंध लोकांना समस्या उद्भवत आहेत, यावर उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेकडून हे अॅप तयार केले जाणार आहे.
अंध व्यक्तींना चलनातील नव्या नोटा तसेच नाणे ओळखणे कठीण जात असल्याने, नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या वतीने ऍड. उदय वारूंजीकर यांनी नवीन नोटा व नाणे ओळखता यावे यासाठी नोटांवर संकेत अथवा चिन्हे वापरण्याचे रिझर्व्ह बँकेला आदेश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. (हेही वाचा: चुकूनही डाऊनलोड करु नका हे App , काही सेकंदातच तुमचे Bank Account होईल रिकामे)
यावेळी रिझर्व्ह बँकेकडून वकील श्याम मेहता यांनी बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, ‘या संदर्भात चार तज्ज्ञांची कमिटी स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या अहवालानंतर अशा प्रकारचे अॅप तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. येत्या सहा ते सात महिन्यात हे अॅप वापरासाठी उपलब्ध होईल. दरम्यान हाय कोर्टाने परदेशामध्ये अंध व्यक्तींना नोटा ओळखण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जात आहे याची माहिती घेऊन, त्याचा वापर इथे करता येतो का हे पाहण्याची सूचना रिझर्व्ह बँकेला दिली आहे.