Andhra Pradesh and Telangana Death Toll: आंध्र प्रदेश (Andhra Pradesh Flood) आणि तेलंगणामध्ये (Telangana Flood) मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेल्या विविध आपत्तीग्रस्त घटनांमध्ये किमान 35 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही राज्यांतील 47,000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात (Relief Work) आले होते. अनेक ठिकाणी मदत छावण्या उभारण्यात आल्या होत्या. आंध्र प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमुळे 19 जणांचा मृत्यू झाला, तर तेलंगणामध्ये पाऊस आणि पुरामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Rajasthan Heavy Rain: राजस्थानमधील उदयपूर, डुंगरपूर आणि बांसवाडा जिल्ह्यात मुसळधार पाऊस)
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, दोन्ही राज्यांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल आणि पुढील 24 तासात पाऊस विदर्भ आणि लगतच्या पश्चिम मध्य प्रदेशात वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज मंगळवारसाठी तेलंगणातील आदिलाबाद, मंचेरियल, खम्मम, सूर्यपेट, कोमाराम भीम आसिफाबाद, पेद्दपल्ली, जयशंकर भूपालपल्ली, मुलुगु, भद्राद्री कोठागुडेम आणि महबूबाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील, विशेषत: विजयवाडामधील पूर ही राज्यातील "सर्वात मोठी आपत्ती" असल्याचे म्हटले आहे.
पूर परिस्थीतीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवानांसह एकूण 47 पथके मदतकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत. सोमवारी राज्यातील साडेतीन लाखांहून अधिक लोकांना आन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, विजयवाडातील प्रकाशम बॅरेजमधून सोमवारी 11.43 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेला. तर, आज मंगळवारी 9.64 लाख क्युसेक विसर्ग नोंदवला गेला. पाऊस ओसरला असला तरी, अजितसिंग नगरसह इतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याची नोंद आहे, पुराचे पाणी कमी होत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देखील पंतप्रधान मोदींकडे पूर ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. आंध्र प्रदेश राज्यात पुरामुळे आतापर्यंत 5,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. केंद्राकडून 2,000 कोटी रुपयांची तात्काळ मदत मागितली आहे. राज्य सरकारने त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली.