गेल्या आठवड्यात रेल्वे मंडळाकडून नववर्षात प्रवासी भाडेवाढी (Railway Fare) करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. परंतु, अद्याप प्रवासी भाडेवाढी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव (Railway Board Chairman Vinod Kumar Yadav) यांनी स्पष्ट केले आहे.
मागील आठवड्यात यादव यांनी रेल्वभाड्यांचे सुसूत्रीकरण केले जाईल, असे वक्तव्य केले होते. शनिवारी त्यांनी भाडेवाढी संदर्भात कोणतीही चर्चा केली नाही. परंतु, नवीन वर्षापासून प्रवाशांना जास्तीत-जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ केली जाईल, असंही यादव यांनी यावेळी स्पष्ट केलं.
यादव यांनी मागील आठवड्यात भाडेवाढ हा संवेदनशील मुद्दा असून याबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी दीर्घ चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. मालगाड्यांचे भाडे अगोदरपासून जास्त आहे. त्यामुळे आम्हाला रस्त्यावर होणारी मालवाहतूक रेल्वेकडे वळवायची आहे, असेही त्यांनी त्यावेळी सांगितले होते. (हेही वाचा - IRCTC: कन्फर्म तिकिट न मिळाल्यास Vikalp Scheme चा वापर करा, जाणून घ्या नियम आणि अटी)
भारतावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. याचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्नावरही होतो. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि मालवाहतून करणाऱ्या रेल्वे गाड्यांची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यापासून सरकारपुढे आहे. रेल्वे भाडेवाढीचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांकडे सादर करावा लागत असतो. याअगोदर अशा प्रकारचा एक प्रस्ताव रेल्वे मंडळाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यापुढे ठेवला होता. मात्र, सुरेश प्रभू यांनी हा प्रस्ताव मंजूर केला नाही.