महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात
राहुल गांधी | (Photo Credit: IANS)

सध्या संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुका उलटून अवघा महिना झाला. मात्र राज्यात सत्तासंघर्ष चालू आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी फडणवीसांना पाठिंबा दिला. परंतु, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संत्पत्त प्रतिक्रिया उमठू लागल्या. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघात केला आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाल्याचा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. (हेही वाचा - Maharashtra Government Formation Live News Updates: महाराष्ट्रातील सत्तापेचाचे लोकसभेतही पडसाद; उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सभागृह तहकुब)

एएनआय ट्विट - 

महाराष्ट्रातील राजकारणावरुन राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकांची तोफ डागली आहे. सध्या लोकसभेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राहुल गांधी आज सभागृहात बोलताना म्हणाले की, 'मला सभागृहामध्ये काही प्रश्न विचारायचे होते. मात्र, आता त्याला काही अर्थ नाही. कारण, महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे.' तसेच लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी 'संविधानची हत्या बंद करा, बंदा करा', अशी घोषणाबाजी केली.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही भाजपवर कडाडून टीका केली आहे. 'जनादेशाच्या खुल्या अपहरणाच्या युगात आपण पोहोचलो आहोत की काय?' असा प्रश्न केला आहे. तसेच 'भाजपाने महाराष्ट्रात देशाची राज्यघटना व घटनात्मक संस्थांना ठेंगा दाखवून कर्नाटकातील सत्तेच्या खेळाची पुनरावृत्ती सुरू केली आहे', असंही म्हटलं आहे.