पुलवामा हल्ल्यात (Pulwama Terror Attack) 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. जवानांच्या कुटुंबांवर हा फार मोठ आघात होता, यातून अजूनही कुटुंबीय सावरत आहेत. अशात ऑनलाईन चोरट्यांनी या कुटुंबांनाही आपली शिकार बनवण्यास सुरुवात केली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले कुलविंदर सिंह यांच्या आई-वडिलांना तब्बल दीड लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे, 2 मे रोजी ही घटना घडली, त्यानंतर ताबडतोब सीआरपीएफ (CRPF) कडून पंजाबमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलविंदर सिंह यांच्या आई-वडिलांना भेटायला एक भामटा सीआरपीएफ जवानांचा गणवेश परिधान करून आला. सरकार तुमच्या खात्यात 29 लाख रुपये ट्रान्स्फर करू इच्छित आहे, असे सांगून त्याने यांच्या बँक खात्याचा तपशील घेतला. त्यानंतर या भामट्याने त्यांच्या खात्यातील 50 लाख रुपयांची रक्कम इतर खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी बँकेचे काही नियम असल्याने हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही.
(हेही वाचा: डेटिंगसाठी मुलगी देतो सांगून पुण्यातील 12 वीच्या मुलाला 3 लाख 64 हजाराला लुबाडले)
मात्र तरी हा भामटा दीड लाखाची रक्कम आपल्या खात्यात ट्रान्सफर करण्यात यशस्वी झाला. ही घटना उघडकीस येताच CRPF कडून अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशा प्रकारचे भामटे, आणि घटनांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांना जवानांच्या कुटुंबियांच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे, जेणेकरून इतर कोणाची अशी फसवणूक होऊ नये.