पुण्यात ऑनलाईन फसवणुकी (Online Fraud) चा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. आश्चर्य म्हणजे यामध्ये एका 12 वी मध्ये शिकणाऱ्या मुलाची फसवणूक झाली आहे. डेटींग अॅपवर डेटसाठी मुलगी देण्याच्या बदल्यात या मुलाकडून 3 लाख 64 हजार रुपये लुबाडण्यात आले आहेत. हा मुलगा त्याच्या वडिलांच्या नकळत त्यांच्या कार्डावरून हे पैसे भरत होता. एक आठवड्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वडिलांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन मोबाईलधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पोलीस पुढील शोध घेत आहेत.
पुण्यातील एका ज्युनियर कॉलेजमध्ये हा मुलगा शिकत आहे. याने लोकॅन्टो (Locanto) या अॅपवर नोंदणी केली होती. या अॅपवर डेटिंगसाठी मुली पुरवल्या जातात अशी जाहिरात होती. नोंदणी केल्यानंतर एका व्यक्तीने फोन करून या मुलाला कार्ड रजिस्टर करण्यास सांगितले, तसेच वेळोवेळी फोन करून पैसेदेखील भरण्यास सांगितले. त्यासोबतच त्याला एक प्लॅटीनम कार्डही मिळाले. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. या मुलाने सांगेल तसे तब्बल 3 लाख 64 हजार रुपये आपल्या वडिलांच्या नकळत भरले. 17 नोव्हेंबर 2018 ते 27 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. मात्र पुढे काहीच झाले नाही. (हेही वाचा : धक्कादायक: तब्बल साडेपाच हजार पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक; कोट्यावधी रुपयांची चोरी)
एक आठवड्यानंतर खात्यातील व्यवहार पाहता वडिलांच्या ही गोष्ट लक्षात आली. आपली फसवणूक झाली आहे ही गोष्ट लक्षात येताच वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. भारतीय कलम 419 आणि 420 अंतर्गत या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस इन्स्पेक्टर वैशाली गलांडे या घटनेचा तपास करीत आहेत.