Wrestlers Protest (PC - ANI/Twitter)

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अडचणी वाढत आहेत. आता विरोधक कुस्तीपटू (Wrestlers) त्यांच्या विरोधात भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे वळले आहेत. बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक, रवी दहिया आणि दीपक पुनिया यांनी IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.

तक्रारीत डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. यासोबतच डब्ल्यूएफआय अध्यक्षांच्या राजीनाम्याची आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या तक्रारीत ब्रिजभूषण सिंग यांनी खेळाडूंचा मानसिक छळ केल्याचेही म्हटले आहे. (हेही वाचा - Vinesh Phogat on Protest: सरकारसोबतच्या बैठकीनंतर विनेश फोगट म्हणाल्या, 'कॅमेऱ्यासमोर शोषण होत नाही, न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार')

मिळालेल्या माहितीनुसार, कुस्तीपटूंना प्रायोजकत्वाचे पैसेही दिले जात नाहीत आणि प्रशिक्षक गुणवत्तेच्या आधारावर खेळाडूंची निवड करत नाहीत, असे तक्रारीत म्हटले आहे. ब्रिजभूषण सिंग यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लवकरात लवकर समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी कुस्तीपटूंनी पीटी उषा यांच्याकडे केली आहे.

ब्रिजभूषण यांचा राजीनामा देण्यास नकार -

आतापर्यंत डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष कधीही राजीनामा देऊ शकतात अशा बातम्या येत होत्या. मात्र, आता स्वत: ब्रिजभूषण सिंह यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही ते म्हणाले आहेत.