प्रियंका गांधी (Photo Credits PTI)

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देशातील टेलीकॉम कंपन्यांना (Telecom Companies) पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान शहरातील विविध भागात अडकलेल्या प्रवाशांना महिनाभरासाठी मोफत ईनकमिंग-आउटगोईंग सुविधा देण्याची मागणी केली आहे.

सध्या संपूर्ण देशाला कोरोनाने विळखा घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केलं आहे. त्यामुळे देशातील विविध शहरात काम करणारे मजूर अडकून पडले आहेत. सध्या त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन मिळत नाही. त्यामुळे महिनाभरासाठी त्यांना ईनकमिंग-आउटगोईंग सुविधा देण्यात यावी, अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केली आहे. (हेही वाचा - Coronavirus: केरळमध्ये आज 20 नवीन कोरोना बाधित रुग्ण; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 202 वर पोहचली)

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी कुमार मंगलम बिड़ला (वोडाफोन-आइडिया) पी.के. पुरवार (BSNL) आणि सुनील भारती मित्तल (Airtel) यांना पत्र लिहलं आहे. देशात अचानक लॉकडाऊनची घोषणा केल्याने मुंबई तसेच दिल्लीमध्ये अनेक कामगार अडकले आहेत. यातील काही कामगारांचे घर संबंधित ठिकाणापासून दूर आहे. त्यामुळे या कामगारांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी टेलीकॉम कंपन्यांना पत्र लिहून या कामगारांना एक महिन्यासाठी मोफत मोबाईल सेवा देण्याची मागणी केली आहे.