Independence Day 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग नवव्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवणार, दिल्लीत कडेकोट सुरक्षा यंत्रणा तैनात
PM Narendra Modi (PC - ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी सलग नवव्यांदा लाल किल्ल्याच्या (Red Fort) तटबंदीवरून राष्ट्रध्वज फडकवतील आणि देशातील जनतेला संबोधित करतील. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) यंदा 15 ऑगस्ट रोजी होणारा उत्सव विशेष आहे आणि केंद्र सरकारने यानिमित्त 'हर घर तिरंगा'सह अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत.  सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलीस सर्वत्र उपस्थित आहेत.स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात जगभरातील अनेक व्हीआयपी, व्हीव्हीआयपींसह विशेष निमंत्रित सहभागी होणार आहेत.

सोमवारी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष असेल. यावेळी पंतप्रधान मोदी अनेकदा त्यांच्या सरकारने उचललेल्या पावलांच्या महत्त्वाच्या परिणामांवर बोलतात तर कधी महत्त्वाच्या घोषणाही करतात. गेल्या वर्षी आपल्या भाषणात त्यांनी नॅशनल हायड्रोजन मिशन, गती शक्ती मास्टर प्लान आणि 75 आठवड्यात 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती. हेही वाचा Independence Day 2022: 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर देणार 21 देशी तोफांची सलामी, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

यापूर्वी 2020 मध्ये पंतप्रधान मोदींनी जाहीर केले होते की, सहा लाखांहून अधिक गावे ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याचे काम 1000 दिवसांत पूर्ण केले जाईल. प्रत्येक नागरिकाला डिजिटल आरोग्य ओळखपत्र देण्याच्या सरकारच्या योजनेचाही त्यांनी उल्लेख केला. तत्पूर्वी, 2019 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी मुख्य संरक्षण प्रमुख पदाची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.

सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर आणि परिसरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेता विशेष पाळत ठेवण्यात येत आहे. शांततापूर्ण कार्यक्रमासाठी विशेष उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. याशिवाय दिल्लीतील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता कोविड-19 प्रोटोकॉलही लागू केला जाणार आहे. संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी लाल किल्ल्याभोवती 'ड्रोनविरोधी यंत्रणा' लावली आहे. लाल किल्ल्यावर आणि आजूबाजूला उच्च दर्जाचे सुरक्षा कॅमेरे बसवण्यात आले असून त्यांच्या फुटेजवरही चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे. लाल किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एफआरएस कॅमेरेही तैनात करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी स्वातंत्र्यदिनाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची संख्या सात हजारांवर पोहोचली आहे.